अहिल्यानगर, 25 मे 2026: NEET-2026 पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर व इतर सर्व आरोपींवर देशद्रोह व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. दिलीप पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, NEET-2026 ही राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा राष्ट्रीय गोपनीयतेच्या कक्षेत येते. मात्र आरोपींनी संगनमत करून प्रश्नपत्रिका चोरून आर्थिक स्वार्थासाठी ती लीक केली.
या देशविघातक कृत्यामुळे लाखो प्रामाणिक व होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. अनेक विद्यार्थी व त्यांची कुटुंबे मानसिक व आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाली आहेत. परीक्षेतील अपयश व नैराश्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत.
ज्या पालकांनी बेकायदेशीररित्या पेपर विकत घेतले, त्यांनी देखील या गुन्ह्यास खतपाणी घातले आहे. त्यांच्यावरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. या प्रकारामुळे देशाच्या वैद्यकीय क्षेत्राची विश्वासार्हता धोक्यात आली असून देशहितास थेट बाधा निर्माण झाली आहे.
देशहित बाधित करणाऱ्या, तरुण पिढी बरबाद करणाऱ्या व वैद्यकीय क्षेत्राला कलंक लावणाऱ्या आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 124A देशद्रोह अंतर्गत तसेच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याने कलम 304 सदोष मनुष्यवध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, संचालक CBI नवी दिल्ली, तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.


