महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. विदर्भातील काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल असून ते भाजपचे स्थानिक आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली येथील 60 हून अधिक नगरसेवक हे अज्ञातस्थळी गेल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवारांना हा धक्का मानला जात होता. यामुळे खळबळ माजलेली असतानाच दुसरीकडे कॉंग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या एका विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आमदार वडेट्टीवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ” आमच्याही संपर्कात भाजपचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत, त्यांच्यातही प्रचंड वाद आहेत, दुसरा गट आम्हाला मदत करायला तयार आहे ” असं मोठं विधान वडेट्टीवार यांनी केलं आहे. ते नगरसेवक कोण, कुठले, याविषयी मात्र वडेट्टीवार यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. असं असलं तरीही त्यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ माजली असून भारतीय जनता पक्षाच्या गोटात मात्र मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
आमचा उमेदवार ठरलेला नव्हता म्हणून काही लोकांना टोकन म्हणून पाच पाच लाख रुपये दिल्याची माहिती आहे. ही शंभर कोटींची निवडणूक आहे. सिंदेवाही नगराध्यक्ष परत येईल त्यांच्यावर कारवाई होईल, जे जे नगरसेवक गेले, जे त्यांचा पक्षाच्या व्हीप झुगारून गेले त्यांच्यावर कारवाई होईल, व्हीप जरी करू योग्य कारवाई होईल, असा इशारा ही वडेट्टीवार यांनी दिला.
चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा विधान परिषदेच्या जागेवरुन भाजपकडून खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुप्रिया सुळे यांनी रविवारी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.


