पुणे पोलीस आयुक्तालयाने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आज 26 मे पासून ते ८ जून २०२६ पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. जवळपास 14 दिवस हे आदेश लागू राहणार आहेत. वाढत्या महागाईच्या विरोधात अनेक संघटना रस्त्यावर उतरत असल्यामुळे पुढी 14 दिवसांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बकरी ईद आणि इतर सणांच्या काळात शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत, “पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय? असा सवाल केला आहे.”
पोस्टच्या शेवटी त्यांनी, “पोलीस आयुक्त, जमाबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे ? हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे असे म्हटले आहे.”


