अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांचे नाव वापरून खोटा बनाव रचत गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. शहरात शिवसैनिकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 26 मे) जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांची भेट घेत निवेदन दिले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती तपासली जाईल तसेच विनाकारण कोणालाही त्रास दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, विक्रम राठोड, नगरसेवक दत्तात्रय कावरे, अभिषेक भोसले आदी उपस्थित होते.
योगेश चंद्रकांत गलांडे हे सावेडी गाव येथील संघर्ष चौक परिसरात वास्तव्यास असून नवनागापूर येथे त्यांचे कार्यालय आहे. ते स्वराज्य कामगार संघटनेचे सचिव तसेच युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून कंपन्या व कामगार यांच्यात समन्वय साधण्याचे काम ते करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गलांडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, एमआयडीसी परिसरात कंत्राटदार म्हणून काम करणारा चिरंजीव दत्तात्रय गाढवे हा विविध कंपन्यांतील अधिकारी व सुपरवायझर यांना धमकावून त्रास देत असून, त्याच्यावर खंडणी व धमकावण्याचे गुन्हे दाखल आहेत. दि. 27 डिसेंबर 2025 रोजी सनफार्मा चौकात गाढवे याने गाडी आडवी घालत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गलांडे यांनी केला असून त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 958/2025 दाखल करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यानंतर गाढवे याने न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. जामिनाला विरोध करू नये यासाठी धमक्या देण्यात आल्याने एनसी क्रमांक 112/2026 दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तसेच न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याने अटींचे पालन न केल्यामुळे त्याच्याविरोधात जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.
याच पार्श्वभूमीवर स्वतःवरील गुन्हे मागे घेण्यासाठी गाढवे हा सातत्याने खोट्या घटना सांगून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गलांडे यांनी केला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये कथित घटनांबाबत कोणतीही सत्यता आढळून न आल्याने कारवाई झाली नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
निवेदनात म्हटले आहे की, दि. 17 मे 2026 रोजी तोफखाना पोलीस स्टेशन येथे देखील खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये त्यांच्यासह मुलगा, पुतण्या, भाऊ आणि शंकर शेळके यांना गोवण्याचा प्रयत्न झाला. मात्र कथित घटनेच्या वेळी संबंधित सर्वजण घरी असल्याचे सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत.
तसेच दि. 24 मे रोजी घडलेल्या घटनेतही आपला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांचा कोणताही संबंध नसताना मुद्दाम नाव घेतल्याचा आरोप गलांडे यांनी केला आहे. हा संपूर्ण प्रकार ब्लॅकमेल करण्यासाठी तसेच स्वतःविरोधातील गुन्हे मागे घेण्यासाठी रचला गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Ahilyanagar शिवसैनिकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रकार…
- Advertisement -


