“मुलाला मारून टाकीन” धमकी देत भोंदूबाबाचा अत्याचार: पारनेरमध्ये महिलेची 6.5 लाखांची फसवणूक

पारनेर, : मतिमंद मुलाचा आजार बरा करण्याचे आणि भावाचे लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवून एका कुटुंबाची साडेसहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेरमध्ये उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर, मुलाला जिवंत मारण्याची धमकी देऊन भोंदूबाबाने पीडित महिलेवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात भोंदू बाबा, त्याचा मुलगा आणि महिला साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशी झाली फसवणूक?
पारनेर येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय पीडित महिलेचा 17 वर्षांचा मुलगा मतिमंद आहे. वैद्यकीय उपचार करूनही त्याच्यात सुधारणा होत नव्हती, तसेच शेतीत पिके येऊनही घरातील कर्ज फिटत नव्हते. याच दरम्यान पीडितेच्या भावाचेही लग्न जमत नव्हते. कौटुंबिक अडचणींनी खचलेल्या या महिलेला रुई छत्रपती येथील राजू बन्सी दिवटे, त्याचा मुलगा शशिकांत राजू दिवटे आणि महिला सहकारी शोभा अविनाश तरटे रा. म्हसणे हे देवऋषी असून ते अडचणींवर तोडगा काढतात, अशी माहिती मिळाली होती.

पीडितेने 2020 मधील कोरोना काळापासून या भोंदूबाबाकडे जाण्यास सुरुवात केली. त्यावेळी संशयित भोंदूबाने, “तुमच्या कुटुंबाला मांढरदेवीच्या काळुबाईची बाधा आहे, त्यासाठी होमहवन व पूजा करावी लागेल,” असे सांगितले. मुलाच्या उपचारासाठी 3 ते 4 लाख आणि भावाच्या लग्नासाठी दीड लाख रुपये खर्च येईल, असे सांगून त्यांनी पीडितेकडून फोटो तंत्र-मंत्रासाठी मागवून घेतले.

कर्ज काढून दिले पैसे
सुरुवातीला पूजा साहित्याच्या नावाखाली शोभा तरटे हिने 10 हजार रुपये घेतले. त्यानंतर पारनेर येथील मुख्य बाजारपेठेतील चौधरी कॉम्प्लेक्समधील घरात काळुबाईच्या फोटोसमोर होमहवन करून पीडितेला अंगारा व तीर्थ पिण्यास दिले. जानेवारी 2025 ते मार्च 2026 दरम्यान पीडितेने गायत्री कॉम्प्युटर्स, पारनेर यांच्यामार्फत 2 लाख 56 हजार 684 रुपये ऑनलाईन आणि एप्रिल 2026 मध्ये 2 लाख रुपये रोख, असे एकूण 4 लाख 56 हजार रुपयांहून अधिक रक्कम राजू दिवटे याला दिली. तसेच भावाच्या विवाहासाठी एकूण 1 लाख 93 हजार 530 रुपये ऑनलाईन व रोख स्वरूपात उकळले. ही सर्व रक्कम पीडितेने ‘येस बँक फायनान्स’कडून कर्ज काढून दिली होती.

धमकी देऊन अत्याचार
पैसे उकळल्यानंतरही मुलाच्या तब्येतीत फरक पडला नाही. यादरम्यान आरोपी राजू दिवटे हा पीडितेला मांढरदेव येथे पूजेसाठी चारचाकी गाडीतून नेत असताना त्याने गाडीत अश्लील वर्तन केले. त्यानंतर चौधरी कॉम्प्लेक्समधील फ्लॅटवर “मुलाच्या उत्तम आयुष्यासाठी माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतील, नाहीतर तुझ्या मुलाच्या फोटोचे तुकडे करून काळुबाईच्या कोपाने त्याला मारून टाकीन,” अशी धमकी दिली. मुलाच्या जिवाच्या भीतीने पीडितेने होकार दिला.

राजू दिवटे याने पीडितेला गुंगीचे किंवा रंगीत पाणी पाजून जानेवारी 2025 ते 1 मार्च 2026 दरम्यान तब्बल 8 ते 10 वेळा जबरदस्तीने अत्याचार केला. काहीही फरक न पडल्याने जेव्हा पीडितेने आणि तिच्या भावाने आपले पैसे परत मागितले, तेव्हा आरोपींनी दोघांनाही शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. “कुठेही तक्रार केली तर समाजात बदनाम करीन, सासरी नांदू देणार नाही,” अशी धमकी पीडितेला दिली, भावाला “एका रात्रीत तडफडून मारून टाकीन” अशी तांत्रिक धमकी दिली.

गुन्हा दाखल
भीतीच्या छायेत असलेल्या पीडितेने अखेर आपल्या सासू-सासऱ्यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी धीर दिल्यानंतर पीडितेने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह बलात्कार, फसवणूक आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles