राहुरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपात प्रवेश केला. राहुरीचे नगराध्यक्ष आणि आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे भाजपात स्वागत केले, तसेच देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दिल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचे भाचे असल्याने त्यांना पक्षप्रवेशानंतर यासंदर्भाने प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा, भाजप पक्षप्रवेशाचे कारण सांगत त्यांनी जयंत पाटील यांच्याबाबतही भाष्य केलं.
मी वेळोवेळी माध्यमांना सांगितलं आहे की, सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असेल राजकीय भवितव्य बघता सर्वांच्या इच्छेचा आदर करून मी पक्षप्रवेश केला आहे. पोटनिवडणुकीच्या वेळी विकास कामाचा विषय होता, धरणामधला गाळ काढण्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, इतरही काम प्रगतीपथावर आहेत. आता, मी पक्षात असल्यामुळे पाठपुरावा करीन, असे प्राजक्त तनपुरे यांनी भाजप प्रवेशानंतर बोलताना म्हटले. जयंत पाटील यांच्यासंदर्भात विचारले असता, माझं गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्याशी बोलणं झालं नाही माझं शेवटचं राजकीय बोलणं हे राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळेसच झालं असावं. पण, राजकीय विषयावर त्यानंतर मी काही चर्चा केली नाही, असे प्राजक्त यांनी सांगितले. तसेच, माझ्या भाजप प्रवेशाचा आणि त्यांच्या राजकीय समीकरणाचा काही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही नातेवाईक असलो ते मामा असले, मी भाचा असलो तरी आमच्या दोघांच्या मतदारसंघाचे राजकीय समीकरण वेगवेगळे आहेत, त्यांची राजकीय उंची खूप मोठी आहे. माझ्या प्रवेशाचा त्यांच्या राजकारणाशी कुठला संबंध नाही, असे म्हणत जयंत पाटील यांच्यासंदर्भात तनपुरे यांनी आपल्या भावना मांडल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीला मी होतो, तेव्हा विलिनीकरणासंदर्भात चर्चा होत्या. अजित दादा स्वतः त्या बैठकीला होते, दादा एकटेच होते त्यावेळेस. मी काल सुप्रियाताईंना भेटलो आहे, माझ्या काय भावना आहेत त्या ताईंच्या कानावर घातल्या, त्यांच्या सदिच्छा माझ्यासोबत राहतीलच, असेही प्राजक्त यांनी म्हटले. मी शरद पवार यांना अवश्य भेटेन, ते काय बोलले मला माहित नाही. शरद पवार यांच्याशी एक-दोनदा फोनवर चर्चा झाली, अशी माहितीही प्राजक्त यांनी भाजप प्रवेशानंतर दिली.


