अहिल्यानगर -मुरूम चोरी करणार्या जेसीबीचा पाठलाग करून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणार्या दोघांना भरधाव जेसीबीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (29 मे) मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जरे वस्ती परिसरात घडली होती. घातपाताचा आरोप करण्यात आला होता, आता प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय कसबे (वय 38, रा. तपोवन रोड, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या जबाबावरून फिर्याद दाखल करण्यात आली आहे. धनगरवाडी शिवारातील हनुमान मंदिरालगतच्या प्लॉटमधून काहीजण जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या मुरूम उपसा करत असल्याची माहिती मिळाल्याने फिर्यादी विजय कसबे व त्यांचा मित्र प्रदीप चिंचाणे (वय 51, रा. सप्तश्रृंगी कॉलनी, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) हे तेथे गेले होते. यावेळी राम म्हस्के व त्याच्यासोबत असलेला जेसीबी चालक मुरूम चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. आपली पोलखोल झाल्याचे लक्षात येताच संबंधित संशयित आरोपी जेसीबी घेऊन जेऊरच्या दिशेने पळून जाऊ लागले. यावेळी कसबे व चिंचाणे यांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरू केला.
नगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील जरे वस्ती परिसरात दुचाकीस्वारांनी जेसीबी अडवण्याचा प्रयत्न केला असता, जेसीबी चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीवरील दोघांना काही अंतर फरफटत नेल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेत चिंचणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर कसबे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी चालकाने कृत्यामुळे गंभीर दुखापत अथवा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असूनही निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालविल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून संशयित आरोपी राम म्हस्के याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जेसीबी जप्त केला आहे.


