Friday, February 20, 2026

अहिल्यानगर महापालिकेतील कर्मचारी संघटनेकडून तीव्र नाराजी , बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

अहिल्यानगर : महापालिकेतील कामगार-कर्मचाऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असून, वेळोवेळी निवेदन, पत्रव्यवहार आणि चर्चेनंतरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कामगार संघटनेकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. २८ मे २०२५ पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सरसर यांनी दिला आहे.
कामगार संघटनेच्या म्हणण्यानुसार, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५०६ कोर्ट कर्मचाऱ्यांना ५ व्या वेतन आयोगाचा फरक २४ समान हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय झाला असून, केवळ एक हप्ता दिवाळीपूर्वी अदा करण्यात आला आहे. उर्वरित हप्ते अद्याप देण्यात आलेले नाहीत. याशिवाय, हद्दवाढीतील कामगारांचे फरकाचे तक्ते अद्याप तयार झालेले नाहीत. ६ व्या वेतन आयोगाचे दोन हप्ते कामगारांना मिळालेले नाहीत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही फरकाची रक्कम दिलेली नाही. कालबद्ध पदोन्नतीच्या फरकाची रक्कम गेल्या ८-१० वर्षांपासून थांबलेली आहे. वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिले तात्काळ अदा करणे व ती भविष्यात दरमहा पगारासोबत देणे, निवृत्ती वेतन अंशदान योजनेतील २५० लाभार्थ्यांची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करणे, आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेळेवर जमा करणे, या मागण्या रखडलेल्या असून, एल.जी.एस.-एल.एस.जी.डी. परीक्षा उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना जादा वेतनवाढ देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा, तसेच निवड समिती गठित करून पात्र कर्मचाऱ्यांना बढती आणि कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. आरोग्य विभागातील RCH व NUHM कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ देणे, तसेच महासभेच्या ठरावानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ मंजुरीसाठी पाठवावा, अशीही मागणी कामगार युनियनच्या वतीने महापालिका आयुक्त यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना राबवावी, आणि ANM परिचारिकांना शासकीय नियमानुसार वेतनश्रेणी लागू करावी, अशीही ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे. आम्ही आंदोलन करणे टाळू इच्छितो, पण प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन अपरिहार्य ठरेल, असा स्पष्ट इशारा कामगार संघटनेचे आनंद वायकर यांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles