अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडत माजी आमदार स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या कुटुंबीयांचा उमेदवारीवर पहिला हक्क असल्याचे स्पष्ट केले.
“सचिन जगतापांना उमेदवारी द्या”
भोसले म्हणाले की, “स्वर्गीय अरुणकाका जगताप हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून दोनदा अपक्ष निवडून आले होते. त्यांना व आमदार संग्राम जगताप यांना निवडणूक लढवण्याची चांगली हातोटी आहे. सर्वांबरोबर चांगले संबंध असून त्यांच्या कुटुंबीयांचा या जागेवर पहिला हक्क आहे.” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगरची जागा पक्षाकडे घेऊन आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांना उमेदवारी द्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या निवडणुकीत मतदानासंदर्भात वेगळा विचार करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
“निष्ठावंतांना डावलल्यामुळेच पक्षाची ही अवस्था”
यावेळी त्यांनी मागील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीपदाच्या वाटपावरही भाष्य केले. ते म्हणाले की, “त्या काळात आमदार संग्राम जगताप यांचा मंत्रीपदावर ठोस दावा असतानाही त्यांना डावलण्यात आले. त्याऐवजी पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्राजक्त तनपुरे यांना मंत्रीपद देण्यात आले. आज ते कोणत्या राजकीय पक्षात आहेत, हे संपूर्ण राज्य पाहत आहे. निष्ठावंतांना डावलल्यामुळेच पक्षाची काय अवस्था झाली हे आपण पाहत आहोत.”
“मामाच्या हट्टापायी डावलले”
भोसले पुढे म्हणाले की, “अहिल्यानगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळेमुळे रुजविण्याचे आणि त्याचा वटवृक्ष करण्याचे मोठे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांचाही त्यांना मंत्री करण्यासाठी प्रबळ आग्रह होता. मात्र, एका मामाच्या हट्टापायी शेवटच्या टप्प्यात त्यांना डावलण्यात आले आणि कारखानदारीला प्राधान्य देण्याचा निर्णय शरद पवार गटातील नेतृत्वाने घेतला.”
“वारसाहक्काच्या राजकारणाला महत्त्व”
त्यांनी आरोप केला की, “जनाधार, संघर्ष आणि कार्यकर्त्यांची ताकद एका बाजूला ठेवून वारसाहक्काच्या राजकारणाला महत्त्व देण्यात आले. कार्यकर्त्यांच्या भावना आणि जनतेचा कौल दुर्लक्षित करून एका भाच्याला पुढे केले गेले. आज तोच भाचा सत्तेच्या लोभासाठी भाजपमध्ये जात असल्याचे चित्र दिसत आहे.”
शेवटी गणेश भोसले म्हणाले की, “राजकारणात जे पेरले जाते तेच उगवते. निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून घेतलेल्या निर्णयांचे परिणाम आज सर्वांसमोर आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत योग्य न्याय झाला पाहिजे.”


