अहिल्यानगर, दि. 1 जून 2026:* एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जलस्रोतांचे नियोजन, चाऱ्याची उपलब्धता तसेच संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आतापासूनच सज्ज राहून प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात एल-निनोचा प्रभाव आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी अनुपकुमार यादव, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी अभिजित हराळे उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
*”टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करा”*
डॉ. आशिया म्हणाले, जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा द्यावा. ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा योजनांची नियमित तपासणी करून त्या सतत कार्यान्वित राहतील, याची दक्षता घ्यावी.
*अनधिकृत पाणी उपशावर कारवाई*
जिल्ह्यातील उपलब्ध पाणीस्रोतांमधून अनधिकृतपणे पाणी उपसा होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. अशा प्रकरणांवर शीघ्रगतीने कारवाई करण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष पथक स्थापन करून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
*चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन*
संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पशुधनासाठी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध राहणे आवश्यक आहे. यासाठी गाव, मंडळ आणि तालुकास्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. ज्या भागात चाऱ्याची उपलब्धता अधिक आहे, तेथून चारा टंचाई असलेल्या तालुक्यांमध्ये चाऱ्याचा पुरवठा करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, असे निर्देश त्यांनी दिले.
पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये. प्रत्येक तालुक्यात नियमितपणे पाण्याचे नमुने तपासण्यात यावेत. प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, असेही ते म्हणाले.
बैठकीत कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जलसंपदा विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महावितरण, नगरपरिषद प्रशासन तसेच इतर संबंधित विभागांकडून सद्यस्थितीचा आढावा सादर करण्यात आला.


