नव्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश न केल्याने राष्ट्रवादीतील एक गट नाराज होता. आता ही नाराजी दूर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून त्यांनी आज राजभवनात जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांचं मंत्रिमंडळात स्वागत केलं. दरम्यान, नाराजीनाट्य दूर झाल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या संभाव्य खात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ म्हणाले, ” खात्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. मी सर्व विभाग सांभाळले आहेत. त्यामुळे कोणताही विभाग मिळाला तरी चालेल. जो विभाग मिळेल तो सांभाळेन”, असं छगन भुजबळ म्हणाले.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असूनही महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी अजित पवारांवरही टीका केल्याचं दिसून आलं. भुजबळांची हीच नाराजी आता दूर करण्यात येणार आहे. अजित पवारांनी मंत्रिपदावरून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. त्यावेळी फडणवीसांनी भुजबळांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. या संयमाचं फळ त्यांना मिळालं आहे असंच म्हणता येईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी मतदार आपल्यासोबत राहण्यासाठी महायुतीकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही खेळी खेळल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. धनंजय मुंडे यांच्या रुपाने ओबीसी नेतृत्व या आधी मंत्रिमंडळात होतं. पण त्यांना संतोष देशमुख प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. आता छगन भुजबळांच्या रुपाने ओबीसी नेता मंत्रिमंडळात असणार आहे. छगन भुजबळांनी त्यांच्या नाशिकमधील काही निवडक कार्यकर्त्यांना सोमवारी रात्रीच मुंबईत बोलावून घेतलं आहे.


