पाथर्डी -तालुक्यातील शेकटे फाटा परिसरातील न्यू शुभम बिअर बार अँड परमिट रूम येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही या ठिकाणी व्यवसायिकांच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की, भुतेटाकळी येथील हॉटेल व्यावसायिक भगवान विठ्ठल भाबड (वय ३१) यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ६ जून २०२६ रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करून ते हॉटेलमधीलच एका खोलीत झोपले होते. सकाळी साडेसात वाजता उठल्यानंतर हॉटेलचा मुख्य दरवाजा उघडा असून कोंडा-कुलूप तुटलेले दिसले.त्यानंतर हॉटेलमध्ये पाहणी केली असता संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले.
तसेच विदेशी दारूच्या बाटल्या आणि गल्ल्यातील रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी कडी कोंयडा-कुलूप तोडून आत प्रवेश करत विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या तसेच गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.चोरीमध्ये विदेशी मद्यांच्या बाटल्या तसेच बिअरच्या बाटल्या चोरट्यांनी लंपास केल्या. याशिवाय गल्ल्यातील १९ हजार ७००रुपयांची रोख रक्कम देखील चोरून नेण्यात आली.
चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत १ लाख ४६ रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विदेशी मद्याच्या २१८ बाटल्या, विविध ब्रँडच्या बिअरच्या १३९ बाटल्या, गल्ल्यातील १९७०० रुपये रोख असा एकूण १ लाख ४५ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेलेला आहे. मध्यरात्री झालेल्या या चोरीमुळे शेकटे फाटा परिसरात खळबळ उडाली आहे.


