पुण्यात तोतया ‘लेडी सिंघम’ला बेड्या, घराची झाडाझडती अन् पोलीसही चक्रावले!

पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले… पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका तरुणीने थेट पोलिसांचा गणवेशच परिधान केला. अंगावर खाकी, खांद्यावर स्टार आणि रुबाबदार वावर… पण ही खरी पोलीस अधिकारी नसून तोतया “लेडी सिंघम” असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील लष्कर पोलिसांनी या 25 वर्षीय तरुणीला कॅम्प परिसरातून अटक केली असून तिच्या या कारनाम्यामुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.पुण्यातील कॅम्प परिसरात पोलिसांच्या वर्दीत वावरणारी ही तरुणी पाहून अनेकांना ती खऱ्या अर्थाने पोलीस अधिकारी असल्याचं वाटत होतं. मात्र तिचा हा खाकी रुबाब फार काळ टिकला नाही. अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण (वय 25) असे आहे. आरोपी महिला पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा गणवेश परिधान करून नागरिकांवर प्रभाव आणि रुबाब पाडत होती. मात्र, लष्कर पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तोतया महिला पोलिसाचा भांडाफोड झाला.

6 जून रोजी लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे कॅम्प परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एका खाजगी क्लिनिकबाहेर पोलिसांच्या वर्दीत उभी असलेली ही तरुणी त्यांच्या नजरेस पडली. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पीएसआय शिंदे यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिची चौकशी सुरू केली. “तू कोणत्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेस? तुझे आयडी कार्ड कुठे आहे?” अशा पोलिसी प्रश्नांची सरबत्ती सुरू होताच संबंधित तरुणीची बोलती बंद झाली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, ती खोटी पोलीस असल्याचे उघड झाले. या संपूर्ण कारवाईची माहिती पोलीस उपआयुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली आहे.

पोलीस तपासात या प्रकरणाची आणखी एक धक्कादायक बाजू समोर आली आहे. आरोपी समिनाला कॅम्प परिसरातील एका नामांकित क्लिनिकमध्ये उपचारासाठी डॉक्टरांची वेळ हवी होती. मात्र, तिथे गर्दी असल्याने तिला डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळत नव्हती. त्यामुळे तिने थेट पोलिसांचा गणवेश परिधान केला आणि आपण पोलीस अधिकारी असल्याचा आव आणत क्लिनिकच्या रिसेप्शनवर दबाव टाकून लवकर अपॉइंटमेंट मिळवण्याचा प्रयत्न केला.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी समिनाच्या घराची झडती घेतली असता, तिथे पोलिसांचे आणखी काही गणवेश (वर्द्या) आढळून आले आहेत. त्यामुळे यापूर्वीही तिने अशाच प्रकारे कुणाची आर्थिक किंवा अन्य फसवणूक केली आहे का? किंवा पोलीस असल्याचे सांगून कुणाला धमकावून काही बेकायदेशीर लाभ घेतला आहे का? याचा आता गुन्हे शाखेच्या मदतीने सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीनुसार, समिनाचे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. सध्या ती एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. मात्र, अपूर्ण राहिलेले स्वप्न खोट्या मार्गाने पूर्ण करण्याच्या नादात तिने कायद्याचाच भंग केला आणि अखेर खऱ्या पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles