एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही जिवाचे रान करू असे वक्तव्य शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे प्रमोशन झाले पाहिजे. महाराष्ट्राचा आवाज देशभरात पोहोचला पाहिजे आणि ते सर्वोच्च पदावर गेले पाहिजेत, हीच आमची इच्छा आहे, असे कडू म्हणाले. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांना वाटत होते की आपण मुख्यमंत्री व्हावे आणि एकनाथ शिंदे यांनाही वाटत होते की आपण मुख्यमंत्री व्हावे, पण तेव्हा ते शक्य झाले नाही. मी सत्तेत असलो तरी आम्ही सामान्य माणसाचे कार्यकर्ते आहोत. आमच्या हातात शिवसेनेचा झेंडा असला तरी डोक्यातून शेतकरी कधीच जाणार नाही. आता हातात शिवसेनेचा झेंडा आणि डोक्यात नेहमी शेतकरी असेल, असेही कडू यांनी स्पष्ट केले.
यावेळी बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली. मात्र ₹2 लाखांपर्यंतच कर्जमाफी मर्यादित ठेवण्यात आल्याने अनेक शेतकरी वंचित राहतील. त्यांनी सर्व शेतकर्यांसाठी व्यापक कर्जमाफी, व्याजमाफी, OTS अटी शिथिल करणे आणि प्रोत्साहन निधी वाढवावी. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू.


