अहिल्यानगर: नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल १२ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोल्हेगाव येथील विठ्ठल रेवन्नाथ पाटेकर या ३२ वर्षीय तरुणाने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी मंगेश मार्शल भिंगारदिवे, नितीन बाळासाहेब जाधव, कालिदास बेळगे, दिवाकर नादी आणि बाळासाहेब केदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी विठ्ठल पाटेकर यांची ओळख टायपिंग क्लासला जात असताना मंगेश भिंगारदिवे याच्याशी झाली होती. मंगेशने आरोग्य विभागात लॅब टेक्निशियनची नोकरी लावून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून वेगवेगळ्या टप्प्यांवर पाटेकर यांच्याकडून एकूण १५ लाख रुपये उकळले. नोकरीचे काम न झाल्याने पाटेकर यांनी पैशांची मागणी केली असता, आरोपींनी त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया आणि नंतर एका निवासी शाळेचे खोटे नियुक्ती आदेश (ऑर्डर) देऊन त्यांची फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटेकर यांनी पैशांसाठी तगादा लावला. त्यावर आरोपींनी त्यांना वारंवार धमकावले आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तडजोडी दरम्यान पाटेकर यांना २ लाख ६५ हजार रुपये परत मिळाले, मात्र उर्वरित १२ लाख ३५ हजार रुपये आरोपींनी हडप केले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कल्पना चव्हाण पुढील तपास करत आहेत.
नगर शहरात नोकरीच्या बहाण्याने तरुणाची १२ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक
- Advertisement -


