Friday, February 20, 2026

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा ट्विस्ट; नवीन कनेक्शन आले समोर

गेल्या काही दिवसांपासून ज्योती मल्होत्रा हे नाव सोशल मीडियासह देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. ३३ वर्षीय व्लॉगर (Vlogger) ज्योती मल्होत्राला हरियाणाच्या हिसार येथून शुक्रवारी अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या गुप्तहेर विभागासाठी हेरगिरी केल्याचा आरोप ज्योती रानी मल्होत्रावर ठेवण्यात आला आहे. ज्योतीची ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून या चौकशीतून अनेक नवे खुलासे समोर येत आहेत. हरियाणा पोलिसांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
बऱ्याच काळापासून तपास यंत्रणा ज्योतीच्या मागावर

ज्योती मल्होत्रानं कुठे कुठे प्रवास केला, त्याची सर्व माहिती घएतली जात असल्याची माहिती हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. बऱ्याच काळापासून भारतीय तपास यंत्रणा ज्योती मल्होत्रावर लक्ष ठेवून होत्या. अखेर शुक्रवारी तिला अटक करण्यात आली. यानंतर आता पोलिस ज्योतीची कसून चौकशी करत आहेत.

ज्योती मल्होत्रा एक यूट्यूब चॅनल चालवत असून त्यावर प्रवासासंदर्भातले व्हिडीओ अपलोड केले जातात. या चॅनलचे ३ लाख ७७ हजारहून जास्त सबस्क्रायबर्स असून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटलादेखील १ लाख ३२ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
ज्योती मल्होत्रा चीनलाही गेली होती!

दरम्यान, पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ज्योती रानी मल्होत्रा ही पाकिस्तानला अनेकदा जाऊन आली आहे. मात्र, त्यासोबतच ती चीनलादेखील गेली होती. तिच्या प्रवासाचा तपशील आणि आर्थिक बाबींची तपासणी केली जात आहे. ज्योती रानी मल्होत्रा ही पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह्ज अर्थात PIO च्यादेखील संपर्कात होती. ज्योतीकडे भारतीय लष्कर किंवा संरक्षण विभागाशी संबंधित बाबींची थेट माहिती मिळण्याची शक्यता नसली, तरी ती ज्या ठिकाणी राहाते, ते हिसार एक महत्त्वाचं धोरणात्मक ठिकाण आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी दिली आहे.
ज्योतीचा पाकिस्तान दौरा प्रायोजित

याचबरोबर, ज्योतीनं केलेल्या अनेक पाकिस्तान दौऱ्यांपैकी एक दौरा हा प्रायोजित होता. अर्थात, तिच्या या दौऱ्यासाठी आर्थिक निधी पुरवला गेला होता, अशी माहितीही सावन यांनी दिली. या भेटीदरम्यान ज्योती मल्होत्रानं तिथल्या काही उच्चपदस्थांच्या भेटीगाठीही घेतल्या. या भेटी का झाल्या? आणि यावेळी नेमकी कोणती माहिती दिली वा घेतली गेली, यासंदर्भात चौकशी केली जात आहे, असंही सावन यांनी सांगितलं.
ज्योती अतिरिक्त सबस्क्रायबर्स-लाईक्सच्या नादात अडकली?

दरम्यान, या सगळ्या प्रकरणात ज्योती मल्होत्रा तिच्या सोशल चॅनल्ससाठी अतिरिक्त व्यूज आणि लाईक्स मिळवण्याच्या नादात अडकल्याची शक्यताही पोलिसांना वाटत आहे. तिच्या प्रवासाचा खर्च हा तिच्या मिळकतीपेक्षाही जास्त दिसत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. “अतिरिक्त फॉलोअर्स किंवा लाईक्स मिळवण्यासाठी हे इन्फ्लुएन्सर्स अशा सापळ्यांमध्ये अडकतात. त्यांना याचे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय परिणाम माहिती नसतात”, असं एसपी शशांक सावन यांनी सांगितलं.

“आम्ही ज्योती मल्होत्राचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन ताब्यात घेत आहोत. त्यांची फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. तिनं नेमकी कोणती माहिती पाकिस्तानातील हस्तकांना दिली आहे, याचीही माहिती समोर येऊ शकेल. ज्योती पाकिस्तान दूतावास आणि पीआयओंच्या संपर्कात कशी आली? कुणी तिला मदत केली? याचीही चौकशी आम्ही करत आहोत. सायबर तज्ज्ञांचं एक पथक ज्योतीच्या सोशल मिडिया अकाऊंट्सचीही तपासणी करत आहे”, अशी प्रतिक्रिया एसपी शशांक सावन यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles