पुणे-शिर्डी रेल्वे सेवेला राणी लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडीचे प्रस्थान

पुणे-शिर्डी थेट रेल्वे सेवेला हिरवा कंदील

खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

लाखो प्रवाशांची दीर्घकालीन मागणी पूर्ण

शिक्षण, आरोग्य, व्यापार आणि धार्मिक पर्यटनाला मिळणार नवी गती

अहिल्यानगर : प्रतिनिधी पुणे-शिर्डी थेट रेल्वे सेवेचा आज शुभारंभ होताच पुणे, अहिल्यानगर, कोपरगाव आणि शिर्डी परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्यातील दोन महत्त्वाच्या केंद्रांना जोडणारी ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ, खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असून या सेवेमुळे धार्मिक पर्यटनासह शिक्षण, आरोग्य आणि व्यापार क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे. अहिल्यानगर स्थानकावर खा. लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडीचे प्रस्थान करण्यात आले.

या रेल्वे सेवेच्या मंजुरीसाठी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी रेल्वे मंत्रालय, वरिष्ठ रेल्वे अधिकारी तसेच लोकसभेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध स्तरांवर केलेल्या प्रयत्नांमुळे अखेर ही सेवा प्रत्यक्षात सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे हे राज्यातील प्रमुख शैक्षणिक, औद्योगिक आणि आरोग्य केंद्र मानले जाते. दुसरीकडे शिर्डी हे देश-विदेशातील लाखो साईभक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी आणि भाविक प्रवास करतात. थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाल्याने या सर्व घटकांना अधिक सुरक्षित, जलद आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

या रेल्वे सेवेचा लाभ केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित राहणार नसून कृषी व व्यापारी क्षेत्रालाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांच्या बाजारपेठांशी अधिक प्रभावी संपर्क साधता येणार असून व्यापारवृद्धीलाही चालना मिळेल. तसेच उपचारासाठी पुण्यात जाणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना या सेवेचा विशेष लाभ होणार आहे.

खासदार नीलेश लंके यांनी लोकसभेत अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वेसंदर्भातील विविध प्रश्न सातत्याने मांडले आहेत. पुणे-शिर्डी थेट रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन अनेकदा पाठपुरावा केला होता. आज त्या प्रयत्नांना यश मिळाल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे खासदार लंके यांना शुभारंभ सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीचे शिर्डीकडे प्रस्थान झाले. खा. लंके यांनी त्यांनी शुभेच्छा देताना विकासाभिमुख कामांसाठी आपला संघर्ष आणि पाठपुरावा यापुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

जनतेच्या मागण्यांना न्याय मिळवून देणे हेच माझे कर्तव्य आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या रेल्वे, रस्ते, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाशी संबंधित प्रत्येक प्रश्नासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे,” असे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles