शिवसेना (ठाकरे) पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर असून मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. या ‘ऑपरेशन टायगर’च्या अंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा आहे. कारण शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला हे ६ खासदार अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाकडून आता कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली आहे.
‘ऑपरेशन टायगर’च्या या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी एक मोठा दावा केला आहे. ‘तुतारीचे ५ खासदार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात येऊ शकतात’, असं वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.“आम्ही अशा प्रकारचं ऑपरेशन घड्याळ वैगेरे करणार नाही. पण खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामे झाली पाहिजेत. आम्ही अशा प्रकारचं कोणतं ऑपरेशन राबवणार नाहीत. त्यांचं ऑपरेशन ते तुतारीवाले स्वत:च करतील. माझा असा अंदाज आहे की, तुतारीचे कमीत कमी ५ खासदार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात येऊ शकतात”, असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे.
“जर पुन्हा निवडून यायचं असेल तर सर्वांनाच मतदारसंघात विकासकामे करण्याची आणि विकासाबरोबर राहण्याची गरज आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर आता लोकांचा विश्वास आणखी वाढला आहे. पक्ष देखील आणखी मजबूत होत आहे. काही माजी खासदार देखील आता आमच्या पक्षात येणार आहेत, काही विद्यमान खासदार देखील आमच्या पक्षात येऊ शकतात, त्यामध्ये काही अडचण आहे असं मला वाटत नाही. कारण विकासाचा मुद्दा आहे, लोकांना विकासकामे हवी आहेत”, असंही धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलं आहे.


