जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला लष्करी प्रत्युत्तर म्हणून राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान शहीद झालेल्या सहा लष्करी जवानांची नावे भारत सरकारने प्रथमच जाहीर केली आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २५ पर्यटक आणि एका स्थानिक घोडावाल्यासह २६ जण ठार झाले. यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले, यात शहीद झालेल्या सहा जवानांची नावे भारताने पहिल्यांदाच सार्वजनिक केली आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान शहीद झालेल्या सहा जवानांमध्ये भारतीय लष्कराचे पाच जवान आणि भारतीय हवाई दलातील एका सार्जंटचा समावेश आहे.
कोण आहेत शहीद झालेले सहा जवान?
१. सुभेदार मेजर पवन कुमार – मुख्यालय, १० इन्फंट्री ब्रिगेड
२. रायफलमन सुनील कुमार – ४ थी बटालियन जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री रेजिमेंट
३. लान्स नाईक दिनेश कुमार – ५ वी फील्ड रेजिमेंट
४. अग्निवीर मूड मुरली नायक – ८५१ वी लाइट रेजिमेंट
५. हवालदार सुनील कुमार सिंग – २३७ वी फील्ड वर्कशॉप
६. सार्जंट सुरेंद्र कुमार – ३९ विंग, भारतीय हवाई दल
रायफलमन सुनील कुमार यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले, तर सार्जंट सुरेंद्र कुमार यांना वायू पदकाने सन्मानित करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सहा जवानांची नावे नवी दिल्लीतील इंडिया गेट सर्कल येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकात विशेष ग्रॅनाइट फलकांवर कायमस्वरूपी कोरली जातील.


