चास-निमगाव वाघा-निंबळक रस्त्याची दुरवस्था; पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर, 26 जून 2026: चास, निमगाव वाघा ते निंबळक तसेच नेप्ती मार्केट, निमगाव वाघा ते पिंपळगाव कौडा भोर वस्ती या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. तातडीने दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी डॉ. दिलीप डी. पवार यांनी कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, अहिल्यानगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले
निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चास, निमगाव वाघा आणि निंबळक या गावांना जोडणारा हा मार्ग शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावर अवजड वाहनांचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
तातडीने पाहणी व काम सुरू करण्याची मागणी
त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी डॉ. दिलीप पवार यांनी केली आहे.
यापूर्वीही याबत निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. येत्या आठ दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी पंचायत समिती उपसभापती व माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर, डॉ. दिलीप पवार, अंकुश आतकर यांनी दिला आहे.


