शेतकरी दांपत्यास बेदम मारहाण; पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले
नगर – शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील शेतकरी संपत रंगनाथ वांढेकर आणि त्यांच्या पत्नीला गावातील दहा ते पंधरा लोकांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या गंभीर घटनेबाबत वांढेकर दांपत्याने शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असली, तरी पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे अखेर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत न्यायाची मागणी केली.
या प्रकरणी वांढेकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन आपबिती सांगितली. त्यांनी मारहाणीची माहिती देताना असे नमूद केले की, ११ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता ते पत्नीसमवेत घरी परतत असताना काही आरोपींनी त्यांच्यावर लोखंडी रॉड, चेन व लाकडी दांडक्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांना व त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापती झाल्या. यापूर्वीही त्यांच्या अपंग मुलाला धमकावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीकडे स्थानिक पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने न्याय मिळत नसल्याची भावना वांढेकर यांनी व्यक्त केली. त्यांनी सादर केलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी त्वरित दखल घेत शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
वांढेकर यांनी लवकरात लवकर न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाची पुढील भूमिका काय असते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


