कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना घडली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक (PSI) अपर्णा सुखदेव जाधव यांच्याविरोधात २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंद होताच त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस दलातील एका महिला अधिकाऱ्याने आपल्या पतीविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. या घटनेनंतर संशयिताविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास अपर्णा जाधव करत होत्या. तपासादरम्यान संशयिताला मदत करण्यासाठी आणि त्याच्या जामिनाच्या प्रक्रियेत सहकार्य करण्याच्या मोबदल्यात अपर्णा जाधव यांनी लाच मागितली होती. त्यांनी जामीनसाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केलाय.
याआधीही तक्रारदाराच्या वडिलांकडून २५ हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यासंदर्भातील काही पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर करण्यात आले. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात सापळा रचला. मात्र, कारवाईची माहिती मिळाल्याचा संशय आल्याने अपर्णा जाधव यांनी प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली नसल्याचे सांगण्यात आले.
तरीही चौकशीत लाचेची मागणी केल्याचे आणि यापूर्वी रक्कम स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अपर्णा जाधव यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
महिला पोलीस अधिकारी लाच घेताना रंगेहाथ सापडली
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या बावधन पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसापूर्वीच पकडलं होतं. गुन्ह्यात मदत करण्यासाठी, नातेवाईकांना अटक टाळण्यासाठी आणि दोषारोपपत्र लवकर दाखल करण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.


