अशोक खरात प्रकरणात माझ्यावर आणि कुटुंबियांवर वाट्टेल तसे आरोप करण्यात आले आहेत. माझ्या कुटुंबियांना टार्गेट करण्यात आल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. माझी मुलं शैक्षणिक क्षेत्रात असूनही त्यांच्यावरही वाट्टेल तसे आरोप करण्यात आले आहेत. मी आशा मिरगे यांना केलेल्या आरोपानंतर त्यांना नोटीसा पाठवल्या होत्या, मात्र त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत असे चाकणकर म्हणाल्या. दरम्यान, अशोक खरातवर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपट येणार आहे. यावर देखील चाकणकर यांनी भाष्य केलं. दिल्ली हायकोर्टातही मी याचिका दाखल केलेली आहे. त्यात रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया आणि आशा मिरगे यांना नोटिसा गेलेल्या आहेत असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. 10 जुलैला दिल्ली हायकोर्टात मी स्वतः हजर राहणार असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली. काही यूट्यूब चॅनेल्स आहेत त्यांच्याविरोधातही आम्ही कोर्टात जात आहोत असे चाकणकर म्हणाल्या. जो कथित सिनेमा येतो आहे, ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. एखादे पात्र साकारताना सबंधित पात्राची परवानगी घेणे आवश्यक असते, माझी कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यांच्या विरोधताही मी कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलणार असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढत महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू अशोक खरातवर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपट येणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झाला. यामध्ये रूपाली चाकणकरांच्या भूमिकेत अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा पहिला लूक समोर आल्यानंतर चित्रपटात आणखी कोणा कोणाच्या भूमिका असणार याकडे अनेकांची नजर आहे.


