राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची प्रतिक्रिया

अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आपले पहिले निवेदन जारी केले आहे. या घटनेमुळे रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी हे निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले आहे की, “पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षामुळे आणि लाखो रामभक्तांच्या समर्पण, त्याग व भक्तीमुळे रामजन्मभूमीवर बांधलेले हे भव्य मंदिर संपूर्ण हिंदू समाजासाठी आदर, श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र बनले आहे.” पुढे म्हटले आहे की, रामलल्ला मंदिरातील दानपेट्यांमध्ये जमा केलेल्या निधीची चोरी ही दुर्दैवी घटना आहे. यामुळे संपूर्ण समाजाच्या आणि रामभक्तांच्या (आरएसएससह) भावना आणि श्रद्धा दुखावल्या गेल्या आहेत.

दत्तात्रेय होसाबळे यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश सरकारने एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. तपासात दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. राम मंदिराशी संबंधित देणगीच्या चोरीसारखी गंभीर घटना हलक्यात घेतली जाणार नाही, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संपूर्ण हिंदू समाजाची स्वाभाविक अपेक्षा आहे. हे एक असाधारण प्रकरण मानून, मंदिरावरील लाखो रामभक्तांचा विश्वास आणि श्रद्धा कायम राहावी यासाठी मंदिराच्या व्यवस्थापन आणि प्रशासनातील कोणत्याही त्रुटी तात्काळ दूर केल्या जातील. संघाचे म्हणणे आहे की, सध्या लोकांमध्ये संभ्रम आणि प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. यासाठी, मंदिर व्यवस्थापन आणि सरकारने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने सर्व आवश्यक पावले उचलावीत. संघाने विश्वास व्यक्त केला की, जर आर्थिक व्यवस्था पूर्णपणे पारदर्शक असेल, मंदिराचे योग्य व्यवस्थापन केले जाईल आणि धार्मिक पावित्र्य जपले जाईल, तर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट हिंदू समाजाची श्रद्धा आणि विश्वास पूर्वीप्रमाणेच दृढ ठेवेल.

दरम्यान, एकदा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, की ‘अब हिंदू मार नहीं खायेगा’. तसंच आज मी म्हणतोय, ‘अब हिंदू माफ नहीं करेगा’. जे जे मंदिर लुटतायत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करतो आहोत. येत्या रविवारी 5 तारखेला दादरला मारुती मंदिरात रामरक्षा आंदोलन करणार आहोत, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पक्ष वगैरे न बघता, जे जे रामभक्त असतील, जे जे हिंदू आहेत, त्यांनी या आंदोलनासाठी यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केला. आम्ही जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे राम रक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र म्हणू आणि हनुमान चालीसा सुद्धा म्हणू, असे त्यांनी सांगितले. राम मंदिराच्या मागे ज्यांनी ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी ज्यांना तुरुंगवास झाला, त्या सगळ्यांचे कष्ट हे असे आम्ही वाया जाऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

ते म्हणाले की, आज जी काही दरोडेखोरी चाललेली आहे, राजकीय पक्ष फोडले जातायत, आमदार-खासदार चोरले जातायत, खरेदी-विक्री चालू होते, याला ऑपरेशन नाव दिलं जातंय, मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपवर उलटणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितलं. काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, हे फार गंभीर असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles