धर्मादाय संस्थेच्या नावाने घोटाळा; अध्यक्षांसह चौघांविरुद्ध बनावट दस्तऐवजाचा गुन्हा
अहिल्यानगर: रेंज फाउंडेशन धर्मादाय संस्थेतील गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले असून, संस्थेच्या बैठकीची बनावट कागदपत्रे तयार करून सदस्यांच्या खोट्या सह्या, खोटी नोटरी आणि त्याच्या आधारे धर्मादाय आयुक्त कार्यालयात चेंज रिपोर्ट सादर केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संस्थेचे सदस्य अमित कोठारी (रा. माणिकनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. राकेश गांधी, राजश्री गांधी (दोघे रा. सावेडी), मोहित बोरा (शिल्पा अपार्टमेंट, नगर-पुणे रोड) तसेच इतर व्यक्तीविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व शासनाची दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अमित कोठारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते व त्यांची पत्नी शेता कोठारी हे रेंज फाउंडेशनचे वैध सदस्य असून त्यांचे दिवंगत वडील रसिकलाल कोठारी हे संस्थेचे संस्थापक सदस्य होते. रेंज फाउंडेशनच्या नावाचे खाते असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी संबंधित खात्याशी निगडित कागदपत्रांची माहिती घेतली असता संस्थेच्या बैठकीचे ठराव व सदस्यांच्या सह्या संशयास्पद असल्याचे लक्षात आले.
यानंतर संस्थेचे अजेंडा बुक व प्रोसीडिंग बुक मागवून तपासणी केली असता, आपण, पत्नी शेता कोठारी आणि दिवंगत वडील रसिकलाल कोठारी कोणत्याही बैठकीस उपस्थित नसतानाही त्यांच्या नावासमोर सह्या करण्यात आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. फिर्यादीनुसार, फेब्रुवारी 2022 रोजी अजेंडा काढून विशेष सर्वसाधारण सभा झाल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात अशा कोणत्याही सभेची नोटीस किंवा माहिती सदस्यांना देण्यात आली नव्हती. मात्र, बनावट सह्या करून बैठकीचे इतिवृत्त तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या कथित बैठकीच्या आधारे 21 फेब्रुवारी 2023 रोजी धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे चेंज रिपोर्ट दाखल करण्यात आला. या चेंज रिपोर्टवरील सह्या व अंगठे दुसऱ्या कामासाठी घेतले होते, त्यांचा या बदल अर्जाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, या दस्तऐवजांवर नोटरी म्हणून अॅड. जे. डी. कुसमोडे यांच्या नावाचा वापर करण्यात आला. मात्र त्यांनी कधीही संबंधित नोटरीसमोर सह्या केल्या नसून त्यांची ओळखदेखील नसल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.


