पाथर्डी तालुक्यातील पाच गावांत कथित गुन्हेगारी टोळीचा धुमाकूळ; ग्रामस्थ भयभीत

पाथर्डी तालुक्यातील पाच गावांत कथित गुन्हेगारी टोळीचा धुमाकूळ; ग्रामस्थ भयभीत

महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांवर जीवघेणे हल्ले; लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि तलवारीच्या धाकाने दहशतीचे साम्राज्य असल्याचा आरोप

सोमठाणे, नलवडे बुद्रुकसह पाच गावांतील शेकडो ग्रामस्थांची पोलीस अधीक्षकांकडे धाव; ‘मोका’ अंतर्गत कारवाईची मागणी, अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, नलवडे बुद्रुक, वरूर, सुसरे, आखेगाव व कोरडगाव या गावांमध्ये काही व्यक्तींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कथितपणे संघटित गुन्हेगारीचे जाळे उभे करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे ५०० ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांची भेट घेत निवेदन सादर करून संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. तसेच तातडीने कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार संतोष खवले, राहुल खवले, माणिक खवले, अमोल खवले, चिमाजी धनवडे व त्यांच्यासोबतच्या सुमारे वीस ते पंचवीस जणांनी परिसरात कथितपणे संघटित गुन्हेगारी सुरू केली आहे. जुगार, मटका, वाळू तस्करी, अवैध सावकारी, बेकायदेशीर ताबे घेणे आदी आर्थिक फायद्याच्या कथित बेकायदेशीर व्यवसायातून या टोळीने गावागावांत दहशत निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांकडून महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांना लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि तलवारीच्या धाकाने बेदम मारहाण करण्यात आली असून अनेकांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. काही प्रकरणांमध्ये कलम ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल असूनही संबंधित आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप करण्यात आला.
तसेच, काही आरोपींचे पोलिसांशी आर्थिक संबंध व नातेवाईक असल्यामुळे त्यांना संरक्षण मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला. आरोपी पोलिसांसमोरूनही फरार झाल्याचा दावा करत, त्यांच्या दहशतीमुळे अनेक नागरिक तक्रार करण्यास धजावत नसल्याचे सांगितले. गुन्हा दाखल करणाऱ्यांच्या घरी रात्री जाऊन धमक्या देणे, गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे असे प्रकार सुरू असल्याचाही आरोप करण्यात आला.
ग्रामस्थांनी संबंधित आरोपी व काही पोलिसांच्या सीडीआर (Call Detail Records) ची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच शाळेसमोर सुरू असलेल्या कथित अवैध दारू व्यवसायावर तातडीने कारवाई करून संबंधितांवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी पार्वती काकडे, अमोल नलवडे, रामेश्वर काकडे, आप्पासाहेब नलवडे, बुगाबी शेख, मनीषा नलवडे, अर्जुन काकडे यांच्यासह सुमारे ५०० ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांचे माणुसकीचे दर्शन; दालनाबाहेर येऊन ग्रामस्थांशी साधला थेट संवाद निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका स्वतः दालनाबाहेर आले. त्यांनी प्रत्येक ग्रामस्थाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांना धीर दिला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पाथर्डी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, पुढील काळात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास थेट संपर्क साधण्याचे आश्वासनही ग्रामस्थांना दिले. पोलीस अधीक्षकांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेचे व तत्परतेचे ग्रामस्थांनी यावेळी विशेष कौतुक केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles