नगर शहरातील व्यापार्‍याला मारहाण, रोज 500 रूपयांच्या हप्त्याची मागणी

शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील एका कपड्यांच्या दुकानात घुसून ग्राहकाच्या वेशात आलेल्या दोघांनी व्यापार्‍याला मारहाण करत 400 रुपयांची पॅन्ट जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना रविवारी (5 जुलै) रात्री घडली. यानंतर संबंधितांनी दुकान चालवायचे असेल तर दररोज 500 रूपयांचा हप्ता द्यावा, अन्यथा अशीच मुले दुकानात पाठवून रोज कपडे घेऊन जाऊ, अशी धमकी दिल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आकाश प्रकाश शिंदे (वय 33, रा. तपोवन रोड) यांनी सोमवारी (6 जुलै) फिर्याद दिली आहे.

त्यानुसार नितीन मच्छिंद्र शिंदे (रा. वैदुवाडी, अहिल्यानगर) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश शिंदे यांचे हनुमान नगर कमानीसमोर, पाईपलाईन रोड येथे कपड्यांचे दुकान आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शिंदे दुकानात असताना नितीन शिंदे आणि त्याच्यासोबत एक अनोळखी इसम दुकानात आले. अनोळखी इसमाने शिंदे यांना मारहाण केली, त्यांच्या अंगावर थुंकला आणि पॅन्ट घेऊन पळ काढला.

या प्रकारानंतर शिंदे यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, दुकानाबाहेर आलेल्या शिंदे यांना नितीन शिंदे याने तो माझाच लहान भाऊ आहे, त्याला जाऊ दे. मला ओळखत नाही का? जर येथे व्यवसाय करायचा असेल तर मला रोज 500 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, नाहीतर अशीच मुले तुझ्या दुकानात पाठवून रोज कपडे घेऊन जाईन, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.फिर्यादी शिंदे यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलीस येताच नितीन शिंदे तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. फिर्यादीने पोलिसांना त्याची ओळख करून दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलिसांशीही वाद घालत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles