अविश्वास ठरावापूर्वीच कर्जत नगराध्यक्ष रोहिणी घुले यांचा राजीनामा ; नगराध्यक्षपदासाठी ही नावे चर्चेत

कर्जतच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घडामोडींना सोमवारी मोठे वळण मिळाले. नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी (७ जुलै) रोजी विशेष सभा होणार होती. मात्र सभेपूर्वीच घुले यांनी राजीनामा दिला. घुले यांच्या राजीनाम्यानंतर आता नगराध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून नव्या कार्यक्रमाची घोषणा केली जाणार आहे. या पदासाठी छाया सुनील शेलार यांचे नाव पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून त्यांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

कर्जत नगरपंचायतीची सत्ता सुरुवातीला आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीकडे होती. या गटाचे १५ नगरसेवक होते. मात्र मागील वर्षी ११ नगरसेवकांनी आमदार पवार यांची साथ सोडून विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. परिणामी सत्तांतर झाले आणि रोहिणी घुले यांची नगराध्यक्षपदी निवड झाली.त्या वेळी घुले यांची निवड ठरावीक कालावधीसाठी असेल आणि नंतर छाया शेलार यांना संधी दिली जाईल, असे प्रा. शिंदे यांनी म्हटले होते. दरम्यान, तो ठरावीक कालावधी पूर्ण झाल्यानंतरही घुले यांनी राजीनामा न दिल्याने राजकीय संघर्ष तीव्र झाला. गटनेते संतोष मेहत्रे यांच्या विरोधात प्रा. सतीश पाटील यांची बहुमताने गटनेते म्हणून निवड झाली. त्यानंतर घुले यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. मात्र घुले आणि संतोष मेहत्रे यांच्या याचिकेनंतर गटनेतेपदाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली. अखेर १ जुलै रोजी न्यायालयाने स्थगिती उठवली आणि अविश्वास ठरावावर सभा जाहीर झाली. राजकीय गणित पाहता घुले यांच्यासोबत केवळ चार आणि विरोधात १३ नगरसेवक असल्याचे स्पष्ट आहे. बहुमत नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

आता नगराध्यक्षपदासाठी छाया सुनील शेलार, ताराबाई सुरेश कुलथे आणि मोहिनी दत्तात्रय पिसाळ या नावांची जोरदार चर्चा आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पिसाळ यांच्या अभिनंदनाच्या पोस्टही शेअर केल्या आहेत.

माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक नामदेव राऊत यांच्यासोबतचे चार नगरसेवक यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्यामुळे ते किंगमेकर राहणार असल्याची चर्चा आहे. ते ज्यांच्या पारड्यात वजन टाकतील तो नगराध्यक्ष होईल. त्यामुळे याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या तीन दशकांपासून प्रवीण घुले यांच्या नेतृत्वाखाली कर्जतसह तालुक्यात सुरू असलेली आमची जनसेवेची परंपरा यापुढेही अधिक जोमाने पुढे नेली जाईल.

रोहिणी घुले, मावळत्या नगराध्यक्ष

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles