जिल्हा सहकारी बँक शिपाई भरतीत मोठा बदल; शासन निर्णय निघाला

जिल्हा बँक शिपाई भरतीत मोठा बदल; लेखी-मौखिक गुणांची नवी विभागणी

राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची महत्त्वाची भूमिका आहे. तसेच या बँकांच्या आर्थिक स्थितीवर गाव पातळीवरील विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अस्तित्व अवलंबून असते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र त्या-त्या जिल्ह्यापुरते मर्यादित असुन या बँकांचे सर्व सभासद त्या जिल्ह्यातील असतात. ही बाब विचारात घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीमध्ये संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांना संदर्भाधीन क्र. 3 येथील शासन निर्णयान्वये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या ऑनलाईन पदभरती प्रक्रियेतुन चतुर्थश्रेणीतील शिपाई पद वगळण्याबाबत तसेच त्यांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्याबत शासनास निवेदन प्राप्त झाले होते. सदर निवेदनाच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्र. 8 येथील शासन पुरक पत्रान्वये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या ऑनलाईन भरती प्रक्रियेमधुन शिपाई पद वगळण्याबाबत, सदर पदाची शैक्षणिक अर्हता, भरती प्रक्रियेसाठी परिक्षा पद्धत तसेच या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तथापि, त्यानुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडुन शिपाई पदासाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या गुणांबरोबर मुलाखतीसाठी देखील काही गुण राखुन ठेवण्याची शासनास विनंती करण्यात आली आहे. त्यानुषंगाने संदर्भाधीन क्र. 8 येथील शासन पुरकपत्र अधिक्रमित करुन संदर्भाधीन क्र. 1 व 2 येथील शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन पुरकपत्र:-
संदर्भाधीन क्र. 8 येथील शासन पुरकपत्र या शासन पुरक पत्रान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे.
संदर्भाधीन क्र. 1 येथील शासन निर्णयातील मुद्दा क्र. 3 iv नंतर खालीलप्रमाणे मजकूर समाविष्ट करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चतुर्थश्रेणी संवर्गातील शिपाई पदाची भरती प्रक्रिया राबविताना लेखी परीक्षेकरिता 70 गुण व मौखिक परीक्षेसाठी 30 गुण निश्चित करावे.

संदर्भाधीन क्र. 2 येथील शासन निर्णयातील मुद्दा क्र. 9 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या ऑनलाईन भरती प्रक्रियेतुन सुरक्षारक्षक, वाहनचालक, नाबार्डकडील राज्यस्तरीय कार्यबलाच्या अहवालातील प्रकरण 5 मध्ये नमूद वरिष्ठ व्यवस्थापन, मध्य व्यवस्थापन व कनिष्ठ व्यवस्थापनामधील पदे, विशेष / तांत्रिक पदे वगळण्यात आली आहेत. या धर्तीवर चतुर्थ श्रेणीतील शिपाई पद वगळण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

शैक्षणिक अर्हता:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदाकरिता किमान शैक्षणिक अर्हता 12 वी उत्तीर्ण अशी राहील.

भरती प्रक्रिया:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नोकरभरती प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता राखली जाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने बँकेने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नोकरभरतीसाठी बँक स्तरावरुन ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांची लेखी परीक्षा घेणे अनिवार्य राहील. बँकेने अशी परीक्षा अनुभवी व तज्ञ एजन्सीमार्फत घेणे आवश्यक राहील. सदर परीक्षा प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची बँकेच्या संचालक मंडळाने दक्षता घ्यावी. या परीक्षा प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास बँकेच्या संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तसेच संदर्भाधीन क्र. 3 येथील शासन निर्णयान्वये जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील नोकरभरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबतच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयातील मुद्दा क्र. 9 नंतर खालीलप्रमाणे मजकूर समाविष्ट करण्यास मान्यता येत आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या चतुर्थश्रेणीतील पदभरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना 100 टक्के प्राधान्य देण्यात यावे. तथापि, या श्रेणीतील पदभरतीकरिता स्थानिक उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांमधुन भरता येतील.

2. सदरचे शासन पुरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असुन त्याचा सांकेतांक 20260706151912986082 असा आहे. हे शासन पुरकपत्र डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles