अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभरातील धडाकेबाज कारवायांनी अन्न माफियांवर मोठा आळा बसला आहे. राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबवत आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंटसह भेसळयुक्त दूध विकाणाऱ्यांना देखील तुकाराम मुंढेंनी नियम कडक करत इशारा दिला आहे. सध्या तुकाराम मुंढेंची संपूर्ण राज्यासह देशभर चर्चा आहे. याचदरम्यान, तुकाराम मुंढेंनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली.
तुकाराम मुंढेंना या मुलाखतीत जर तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी सीएम बनवलं आणि सगळे अमर्याद अधिकार दिले तर काय कराल?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर लोकशाहीमध्ये असे अमर्याद अधिकार कुणाला नसतात. मी शासकीय कर्मचारी म्हणून मी नेहमी सांगत असतो. आपलं काम हे शासकीय कर्मचारी म्हणून समाजाला वरच्या स्तराला नेण्याचं आहे. मार्गदर्शन करणे, ताकद देणे आहे, समाज जेवढा विकसित होईल, तेवढा आपला देश आणि व्यक्ती विकसित होतील, असं तुकाराम मुंढे म्हणाले. तसेच मला कोणत्याही क्षेत्रात रोल दिला तर ते प्रत्येक दिवशी आणि पुढचा एक इंच कसा वाढेल, हे करताना पूर्णपणे पारदर्शक असेल. जो गोल आणि जो रोल असेल, ते काम झालं पाहिजे, असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलं. मी शासकीय नोकर आहे, मला माझ्या मर्यादा माहीत आहे. लोक मला नायक म्हणत असले तरी मी त्यांचे आभार मानतो, ते मी चांगल्या हेतूने स्वीकार करतो, असंही तुकाराम मुंढे म्हणाले.


