अहिल्यानगर: विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या तक्रारीवरील निकाल देण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था, वर्ग २) मिलिंद प्रल्हादराव राऊत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय? या प्रकरणातील तक्रारदार हे एका विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीने मतदानाचा अधिकार कोणाला द्यावा, याबाबत ठराव करून तो प्रस्ताव सहाय्यक निबंधक यांच्याकडे सादर करायचा होता. त्यासाठी गावातील सोसायटीच्या सचिवांनी सर्व संचालकांची बैठक बोलावली होती व सर्वांना नोटिसाही पाठवल्या होत्या. मात्र, एक संचालक पुणे येथे राहत असल्याने त्यांना नोटीस मिळाली नव्हती. बैठक पार पडली आणि ठराव मंजूर झाला, पण नोटीस न मिळालेल्या संचालकाने त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आणि हा ठराव बेकायदेशीर असल्याबाबत सहाय्यक निबंधकांकडे तक्रार केली.
सहाय्यक निबंधक मिलिंद राऊत यांनी या तक्रारीचा निकाल तक्रारदाराऐवजी सोसायटीच्या बाजूने लावण्यासाठी आणि हे प्रकरण परस्पर मिटवण्याच्या मोबदल्यात त्यांनी सोसायटीच्या सचिवाला सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १० हजार रुपये राऊत यांनी यापूर्वीच स्वीकारले होते. उर्वरित १५ हजार रुपयांसाठी त्यांचा सतत तगादा सुरू होता, त्यामुळे कंटाळून सचिवांनी ९ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली.
एसीबीचा यशस्वी सापळा: तक्रारीची शहानिशा करण्यासाठी १० जुलै रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती उर्वरित रकमेपैकी १० हजार रुपये स्वीकारण्याचे आरोपी लोकसेवक मिलिंद राऊत यांनी मान्य केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तातडीने सापळा रचला. ठरलेल्या नियोजनानुसार, आरोपी राऊत यांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपतच्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली.
ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर प्रत्यक्ष कारवाईमध्ये पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे आणि अंमलदार संतोष शिंदे, वैभव सुपेकर, बाबासाहेब कराड व हारूण शेख यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सविता तांबे करत आहेत.


