देवगड दर्शनासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेचे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण

नेवासा: तालुक्यातील देवगड येथे दत्तदर्शनासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून अपहरण करण्यात आले. दिवसभर ओलिस ठेवून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोकड लुटली. याप्रकरणी मुख्य आरोपी अशोक भानुदास तांबे (रा. सलाबतपूर, ता. नेवासा) याला नेवासा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली.

याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अंगणवाडी सेविका गुरुवारी (दि. ९) देवगड येथे दत्त दर्शनासाठी गेल्या होत्या. देवगड फाटा येथे दुपारी एक वाजता वाहनाची वाट पाहत असताना, देवगडकडे जाणारी कार त्यांच्याजवळ थांबली. चालकाने ‘मलाही देवगडला जायचे आहे, चला सोडतो’ असे सांगितल्याने विश्वास ठेवून त्या कारमध्ये बसल्या.

मात्र, चालकाने कार देवगडकडे न नेता खलालपिंप्री मार्गे नेवाशाकडे वळवली. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आरोपीने त्यांना कारमध्ये ओलिस ठेवले. ताराबाई यांनी विरोध करताच त्यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यांना नेवासा, नगर, शनिशिंगणापूर, सोनई व ब्राह्मणी परिसरात विविध मार्गांनी फिरवले.

नंतर एका निर्जन कच्च्या रस्त्यावर कार थांबवून लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करून जखमी केले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील दागिने व पर्समधील कागदपत्रे, असा एकूण ९६ हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटला. याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी (दि. १२) पहाटे आरोपी अशोक भानुदास तांबे याला अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फर्यादिच्या साडीचा पदर फाडून त्यानेच त्यांचे हात-पाय बांधले. ओरडल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने रात्री साडेनऊ वाजता ताराबाईंना महामार्गावर सोडून पळ काढला. गंगापूर येथे उपचार घेतल्यानंतर शनिवारी त्यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles