शेवगाव बीडीओंविरोधात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शाहा यांच्या कथित मनमानी, दडपशाही व कार्यपद्धतीविरोधात शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी एकत्र येत आमदार मोनिका राजळे यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे.

या निवेदनावर तालुक्यातील 63 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून तातडीने बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरापासून गटविकास अधिकारी सोनल शाहा या शेवगाव पंचायत समितीत कार्यरत आहेत. त्यांची अन्यत्र बदली होऊनही ती रद्द झाल्याने त्या पुन्हा शेवगाव येथे कार्यरत आहेत.

तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असताना त्यांच्यावर अनावश्यक दबाव आणला जात आहे. त्यामुळे अधिकारी मानसिक तणावाखाली काम करत आहेत. दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे.

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर किरकोळ कारणांवरून कारवाईची भीती दाखविणे, नोटीस न देता विनावेतन करण्याची भाषा वापरणे, निलंबनाची धमकी देणे, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा धाक दाखवून काम करण्यास भाग पाडण्यात येत आहे.

याशिवाय पंचायत समितीच्या वाहनासाठी डिझेल खर्च, विविध योजनांतील कामांच्या मंजुरी व बिले अदा करताना आर्थिक मागणी करण्यात येते. त्यामुळे ग्रामपंचायतस्तरावर नागरिकांच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते.

कार्यालयीन वेळेतही अधिकाऱ्यांना बोलावून अपमानास्पद वागणूक दिली जाते. महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनाही मानसिक त्रास सहन करावा लागतो. या वातावरणामुळे अनेक अधिकारी मानसिक तणाव, उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयविकारासारख्या आजारांनी ग्रस्त आहेत. ही परिस्थिती गंभीर असल्याने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची मागणी
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने आमदार मोनिका राजळे यांना संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून गटविकास अधिकारी सोनल शाहा यांची तातडीने बदली करावी. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.

“प्रशासकीय व्यवस्था सुरळीत चालणे, लोकांची कामे वेळेत पूर्ण होणे यासाठी ग्रामपंचायत अधिकारी यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर राहणे, ग्रामपंचायत दफ्तर पूर्ण करणे हे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. प्रशासनाचा भाग म्हणून ज्या तक्रारींमध्ये मला तथ्य वाटले त्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासकीय कारवाया करण्यात आलेल्या आहेत. हे फक्त माझ्या प्रशासकीय जबाबदाऱ्या व कर्तव्याचा भाग आहे.”
– सोनल शाहा, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शेवगाव

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles