Friday, February 20, 2026

Maharashtra Politics: मविआत फूट पडणार ! खासदार सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री होतील, असा दावा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. आज माध्यमांशी बोलत असताना त्यांनी विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांना रोहित पवारांच्या एका विधानाबद्दलचे मत विचारण्यात आले होते. यावर बोलत असताना खासदार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री म्हणून दिसतील, असे विधान संजय शिरसाट यांनी केले.

मानसन्मान मिळाला तर महाविकास आघाडीतून लढू अन्यथा स्वतंत्र उभे राहू, असे विधान रोहित पवार यांनी केले असल्याचा प्रश्न संजय शिरसाट यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शिरसाट म्हणाले, “मान-सन्मानाचा आता प्रश्न उरलेला नाही. रोहित पवारांना माहीत आहे की, आपल्याला आता मविआबरोबर राहायचे नाही. त्यांचे आजोबा दुसरा मार्ग पत्करत आहेत. काका अगोदरच दुसरीकडे गेलेले आहेत. सुप्रिया सुळे मोदींच्या नेतृत्वाखाली विदेशात जात आहेत. म्हणून मविआबरोबर राहणे त्यांना पचनी पडणारे नाही आणि ते राहणारही नाहीत.”

भविष्यातील राजकारण वेगळ्या पद्धतीचे असेल असाही दावा संजय शिरसाट यांनी केला. भविष्यात शरद पवार हे दुसऱ्या पक्षात जाताना आपल्याला दिसतील, असेही ते म्हणाले. यावर पत्रकारांनी त्यांना विचारले की, भविष्यात सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री म्हणून दिसतील का? यावर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, नाकारता येत नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. सुप्रिया सुळे यांची तशीही मंत्री होण्याची तीव्र इच्छा होती.

शरद पवार महायुतीत कधीपर्यंत सामील होतील? याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर संजय शिरसाट म्हणाले, “पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत मोठी उलाढाल होईल, अशी माहिती राजकीय वर्तुळातून मिळत आहे. पण ही माहिती खरी की खोटी? याची पुष्टी झालेली नाही.” पण लवकरच शुभमंगल सावधान होणार असल्याचे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles