जामखेड–माहीजळगाव महामार्गावर भीषण अपघात; दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

जामखेड–माहीजळगाव महामार्गावर भीषण अपघात; दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणामुळे दुर्घटना झाल्याचा आरोप; कंत्राटदारावर कारवाईची सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची मागणी
जामखेड–माहीजळगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी वरील पाटोदा (गरडाचे) परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा गंभीर आरोप नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयसर (एमएच-१४ बीजे-२२८३) आणि हुंडाई वेन्यू (एमएच-२० जीई-३५६२) या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, श्रीगोंदा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक विकील बहुरे आणि कुकडी पाटबंधारे उपविभाग, करमाळा येथील मोजणीदार रामचंद्र बहुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटोदा–रत्नापूर परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे एका बाजूचा रस्ता बंद करून केवळ एकाच लेनवरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. याच ठिकाणी भरधाव वेगातील दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला.
घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेचे चालक महेश मोहोळकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे धनंजय भोसले आणि रोहिदास केकान यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. पाहणीदरम्यान त्यांनी रस्त्याच्या कामातील गंभीर त्रुटींवर संताप व्यक्त केला. अनेक वर्षांपासून महामार्गाचे काम संथगतीने सुरू असून, नव्याने तयार झालेल्या रस्त्यावरही मोठमोठ्या भेगा पडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच खोदकाम करून एका बाजूची वाहतूक सुरू ठेवल्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.
यानंतर संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तसेच तहसीलदार धनंजय बांगर यांना घटनेची माहिती दिली. या अपघाताचा पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण इंगळे करीत आहेत.या दुर्दैवी घटनेनंतर जामखेड– माहीजळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण आणि धोकादायक रस्त्यांच्या कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासनाने आणि कंत्राटदाराने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles