दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेला लाठीमार हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गरजेचा होता. तसे केले नसते तर काही अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण आंदोलन करताना संविधानाने दिलेले हक्क आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. दिल्लीत सुरु असलेले विद्यार्थी आंदोलन चेहरा नसलेले आहे. त्यामुळे या आंदोलनात काही लोक वेगळा अजेंडा घेऊन घुसले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतीपूर्ण आंदोलन करत असेल तर त्याला परवानगी दिली जाईल. मात्र, जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्यासाठी विनापरवानगी आंदोलन करणे, हिंसा करणे, हे कुठल्याही परिस्थतीत योग्य नाही, त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. दिल्लीत आंदोलन झाले, त्यामध्ये अनेक राजकीय पक्ष आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करत आहेत. अनेक संघटना, ज्यांचं या विषयाशी घेणेदेणे नाही, ते अराजकता निर्माण कशी होईल, त्याचे प्रयत्न करत आहेत. ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं, दिल्लीत नेतृत्त्वहीन व्यवस्था पाहायला मिळाली, पोलिसांच्या गाड्या उलटवणे, फोडणे असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या. एक गोष्ट सांगतो, कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं कधीच आवडत नाही. पण काल ज्याप्रकारची अवस्था होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयमही दाखवला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
एक गोष्ट निश्चित आहे की, कुठलंही आंदोलन आपण बघितलं , फेसलेस असतं आंदोलन तेव्हा काही प्रवृत्ती त्यामध्ये शिरत असतात. त्या प्रवृत्ती आंदोलनाचा फायदा घेऊन, आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला स्वार्थ कसा पूर्ण करता येईल, असा प्रयत्न करत असतात. यापैकी अनेकांना नीट परीक्षा काय आहे, परीक्षा कधी झाली, हे माहिती नाही. ते ते आपला अजेंडा रेटत आहेत. सगळे काही एका विचाराने तिथे एकत्र आलेले नाहीत. या आंदोलनात काही हौशे-नवशे, गौशे आपला अजेंडा पूर्ण करत आहेत. मी सगळ्याच आंदोलकांवर आरोप करु इच्छित नाही. या आंदोलनात काही लोक चांगल्या भावनेने सहभागी झाले असतील. पण निश्चितच या आंदोलनात काही असे लोक घुसलेत ज्यांना आपला स्वार्थ साधायचा आहे. ज्यांचं नीट परीक्षेशी घेणंदणं नाही, केवळ अराजकता निर्माण करायची आहे, असे लोक आपला अजेंडा घेऊन या आंदोलनात शिरले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच काही राजकीय पक्ष ज्यांना त्या त्या राज्यात रिजेक्ट केले आहे, ते यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का, असा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही त्यांनी विरोधकांनी हाणला.


