अहिल्यानगर-शहरातील बोल्हेगाव परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पाण्यात बुडाल्यामुळे अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. साई विशाल पवार असे या मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोल्हेगाव येथील भारत बेकरीजवळील आंबेडकर चौक परिसरात राहणारा साई पवार हा चिमुकला सोमवारी (20 जुलै) अचानक पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच त्याचे वडिल विशाल वसंत पवार यांनी त्याला तातडीने उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, रूग्णालयातील डॉक्टरांनी तपासून साई याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी रूग्णालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दिनेश मोरे करीत आहेत. लहान मुलाने अचानक प्राण गमावल्यामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


