अहिल्यानगर जिल्ह्यात ४ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात ४ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

अहिल्यानगर, :- सण, उत्सव, विविध कार्यक्रम, मंत्रीमहोदय व इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे तसेच जातीय संवेदनशील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा महसूल हद्दीत २२ जुलै ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी सुभाष दळवी यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश पारित केला आहे.

या आदेशानुसार शस्त्रे, काठ्या, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दगड, क्षेपणास्त्रे किंवा ती फेकण्यासाठी वापरावयाची साधने जवळ बाळगणे, तयार करणे अथवा जमा करणे, कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा प्रतिमांचे प्रदर्शन करणे तसेच दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणे अथवा तयार करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनिक्षेपक तसेच मानवी आवाजाचे वर्धन करणारी अथवा तो जसा आहे तसा ऐकविणारी उपकरणे वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. सभ्यता किंवा नीतिमत्तेला धक्का पोहोचेल अथवा सार्वजनिक शांतता धोक्यात येईल असे कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, सोंग आणणे तसेच चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे अथवा त्यांचा प्रचार करणे यालाही प्रतिबंध करण्यात आला आहे. सार्वजनिक अथवा खाजगी ठिकाणी सभा घेणे, मिरवणुका काढणे, रस्ता रोको करणे तसेच पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

शासकीय सेवेतील कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्ती तसेच शारीरिक दुर्बलतेमुळे लाठी किंवा काठी वापरणाऱ्या व्यक्तींना हे आदेश लागू राहणार नाहीत. तसेच अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्नसमारंभ व लग्नाच्या मिरवणुकांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक अथवा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतलेल्या सभा व मिरवणुकांनाही या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles