पोलिसांची गाडी अंगावरून गेली असती तरी… व्हॅनसमोर ठामपणे उभी राहणारी रिया अहिरचे धाडसी विधान

कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत २२ जुलै रोजी निदर्शने करण्यात आले. शेकडो तरुण-तरुणी या निदर्शनासाठी दादरच्या शिवाजी पार्क येथे जमले होते. शांततेत चालणाऱ्या आंदोलनावर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतले. आंदोलकांना व्हॅनमध्ये भरून पोलीस नेत असताना त्यासमोर एक मुलगी ठामपणे उभी राहते. या मुलीचा व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. पोलिसांच्या व्हॅनसमोर उभे राहण्याचे धाडस दाखवणाऱ्या रिया अहिरने या प्रसंगावेळी तिची मनस्थिती काय होती, याबाबत माहिती दिली आहे.

कालच्या प्रसंगानंतर रिया अहिर देशभरात रातोरात चर्चेचा विषय ठरली. आज दिवसभर अनेक माध्यमांनी तिच्याशी संपर्क साधला. साम मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना तिने आपण मराठी असल्याचे सांगितले. तिने हिंदी थिएटरचा अभ्यास केला असून ती बरेच वर्ष हिंदी नाटकात काम करत आहे. मॉडेल, अभिनेत्री आणि उद्योजिका असलेल्या रिया अहीरने शिवाजी पार्कात नेमके काय झाले, याचीही माहिती दिली.

रिया म्हणाली की, कालचा प्रसंग ठरवून झाला नव्हता. दिल्लीत अनेक मुले त्यांच्या हक्कासाठी उपोषणाला बसले आहेत. आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी दादरला पोहोचलो होतो. मला व्हायरल व्हायचे नव्हते. पण ते आपोआप होऊन गेले.
व्हॅनसमोर उभे राहण्याच्या प्रसंगाबद्दल रिया म्हणाली की, सोशल मीडियावरून काही जणांची ओळख झाली आणि मी तिथे गेले होते. त्या आंदोलनात माझे कुणी मित्र नव्हते. पोलीस अचानक आले आणि त्यांनी तिथे उभे असलेल्यांना गाडीत भरले. मलाही ते गाडीत टाकणार होते, पण व्हॅन पूर्णपणे भरल्यामुळे आत जागाच नव्हती. एका लहान मुलीलाही त्यांनी गाडीत कोंबले होते, तिला बाहेर काढण्याचा माझा प्रयत्न होता. त्यातच मी समोर जाऊन उभे राहिले.
रिया पुढे म्हणाली, “जेव्हा मी व्हॅनसमोर उभी राहिले तेव्हा ते गाडीला ॲक्सिलेटर देत होते. मला थोडी थोडी भीती वाटत होती, पण ते गाडी अंगावर घालणार नाहीत, याचीही खात्री होती. माझ्या अंगावरून गाडी गेली असती तरी मला काही वाटले नसते. तसे झाले असते तर माझी गणना शहीदांमध्ये झाली असती. असहाय होऊन जगण्यापेक्षा शहीद झालेले बरे.”

माझ्या कुटुंबातील अनेकांनी लष्करात सेवा दिली आहे. माझे वडीलही लष्करात होते. तसेच माझी आई सामाजिक कार्यात सहभागी असते. माझ्या पालकांकडूनच मला ही हिंमत मिळाली, असेही रियाने सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles