शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांसह तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी या खासदारांना अल्पोपहाराचे निमंत्रण दिले होते. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदारही पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. यावरुन विविध चर्चा उपस्थित होत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीमागचे कारण सांगितले आहे. तसेच आम्हाला नाश्त्यासाठी बोलावलेले नाही, असाही खुलासा त्यांनी केला.मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कालच संसदेत आम्ही खासदारांशी चर्चा करत होतो. तेव्हा महाराष्ट्रातील काही गंभीर प्रश्नासंदर्भात खासदारांनी चिंता व्यक्त केली. दुर्दैवाने काही दिवसांपासून सभागृह चालत नाहीये. त्यामुळे राज्यातील पाणी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्या असे काही प्रश्न आहेत. सर्व खासदारांना वर्षाला पाच कोटी रुपयांचा निधी मिळतो, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात अडथळे निर्माण होतात. राज्य सरकारकडून अपेक्षित अशी मदत खासदारांना मिळत नाही. हे प्रश्न घेऊन पंतप्रधानांकडे जाण्याचा सूर खासदारांच्या बोलण्यातून समोर आला.”
“खासदारांशी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) आठ खासदारांनी पंतप्रधान मोदींची अधिकृतरित्या वेळ मागितली. आमच्या आठ खासदारांना पंतप्रधान मोदींनी सोमवारी सकाळी ११ वाजता भेटीची वेळ दिली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नावर आम्ही भेटणार आहोत”, असे सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेचेही खासदार पंतप्रधान मोदींना भेटले होते, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यांच्या खासदारांना नाश्त्यासाठी बोलावले होते. आम्हाला नाश्त्याला बोलावलेले नाही. आम्ही महत्त्वाच्या प्रश्नासाठी देशाच्या पंतप्रधानांची भेट घेत आहोत.
पंतप्रधान सर्वच पक्षाच्या खासदारांना भेटत असतात. आम्ही सरकारमधील मंत्र्यांनाही वेळोवेळी भेटत असतो. त्याप्रमाणेच आम्ही पंतप्रधान मोदींना दिवसाढवळ्या सकाळी ११ वाजता भेटणार आहोत. त्याचा फोटोही सार्वजनिक करू, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्र काँग्रेसने केलेल्या गुंगी गुडिया टीकेवर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच स्पष्टपण बोलल्या. सुनेत्रावहिनींबद्दल महाराष्ट्र काँग्रेसने एक वक्तव्य केलं ते अयोग्यच होतं. मी याबाबत काँग्रेसच्या नेतृत्वाकडे बोलले, मी काँग्रेस नेतृत्त्वाचे याबाबत आभार मानते, मी काँग्रेसच्या नेतृत्वाशी बोलण्यानंतर काँग्रेसने अर्ध्या तासातच त्यांचा स्टँड क्लिअर केला. काँग्रेसच्या महाराष्ट्र स्थानिक आयटी सेलकडून हा प्रकार झाला आहे, हे राष्ट्रीय काँग्रेसचं मत नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. देशाच्या काँग्रेस नेृतत्वाने हे स्पष्ट केलं असून महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये वेगळी मतं आहेत. तसेच, कुणाचा अपमान होईल असं कोणी बोलू नये, केंद्राच्या काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला आहे, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले. तसेच, पंतप्रधानांना 8 खासदार भेटणार असल्याबाबत स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं


