आपल्या कडक शिस्तीसाठी आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यामध्ये प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी घेतलेल्या एका प्रकट मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी आपल्या काही वैयक्तिक आणि प्रशासकीय आठवणींना उजाळा दिला. अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांनी सध्या संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. हॉटेल्स, अन्नभेसळखोर आणि औषध माफियांच्या विरोधात त्यांनी उघडलेली मोहीम चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वीच एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनवर धाड टाकून कारवाई केली होती. या कारवाईचा संदर्भ देत मुलाखतीदरम्यान त्यांना एक मिश्कील प्रश्न विचारण्यात आला, “कॅन्टीनमध्ये एक कॉक्रोच (झुरळ) सापडला तर एवढं काय झालं? असं त्या चालकाने तुम्हाला विचारलं नाही का?”
त्यावर तुकाराम मुंढे यांनी अत्यंत हजरजबाबीपणे उत्तर दिले, “कॉक्रोच काय करू शकतो, हे मागच्या काही दिवसांत आपण सगळ्यांनी पाहिले आहे.” मुंढे यांनी हे सांगताच संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
“आपण मागचे तीन-चार मुख्यमंत्री पाहिले, तर त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा आता देवेंद्र फडणवीस असतील. या सर्वांच्या कार्यकाळात तुम्हाला किमान एकूण अडीच वर्षे कुठेही पोस्टिंग दिली गेली नव्हती. मग उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांपैकी कोणते मुख्यमंत्री तुम्हाला जास्त चांगले वाटतात?” असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी एका वाक्यात उत्तर दिले, “मला तुमचा रिसर्च जास्त चांगला वाटतो.” तुकाराम मुंढे यांच्या या मिश्कील उत्तराने पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हशा पिकला.


