पारनेरचे DPR नोटिफिकेशन प्रसिद्ध; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तातडीचा निर्णय, पारनेरकरांना मोठी खुशखबर
दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या पारनेर शहराच्या विकास आराखड्याचा (DPR) मार्ग अखेर मोकळा झाला आहे. लगेच अंमलबजावणी करून आजच्या तारखेलाच पारनेरच्या विकास आराखड्याचे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी पारनेरच्या DPR ला मंजुरी दिली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे अंतिम नोटिफिकेशन रखडले होते. ही बाब लक्षात घेऊन सुजित झावरे पाटील आणि अनिल शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तातडीने नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्याची मागणी केली.
मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आजच नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत बैठक घेऊन पारनेरच्या DPR चे नोटिफिकेशन आजच प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
पारनेरच्या विकासाला मिळणार वेग
या निर्णयामुळे पारनेर शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या कामांना आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे पारनेरकरांमधून समाधान आणि आनंद व्यक्त केला जात आहे.
पारनेरच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय मैलाचा टप्पा ठरणार आहे.


