आता ‘जन-गण-मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाणार! नव्या नियमावलीत काय? अवमान केल्यास शिक्षा होणार?

राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा) विधेयक २०२६’ ला मंजुरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीत ‘जन गण मन’प्रमाणेच समान कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे.

संसदेने गेल्या महिन्यात ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण कायदा, १९७१’ मध्ये सुधारणा करणारे हे महत्त्वपूर्ण विधेयक बहुमताने मंजूर केले होते. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले असून संपूर्ण देशात हा नियम लागू झाला आहे.

नवीन कायद्यानुसार, ‘वंदे मातरम’चे गायन रोखणे किंवा गायन चालू असताना त्यात अडथळा निर्माण करणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल.

शिक्षेची तरतूद: असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला ३ वर्षांपर्यंतचा कारावास, दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास: जर एखाद्या व्यक्तीने हा गुन्हा पुन्हा केला, तर त्याला किमान १ वर्षाच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.

याआधी १९७१ च्या मूळ कायद्यात केवळ राष्ट्रगीत ‘जन गण मन’च्या अवमानाबाबतच शिक्षेची तरतूद होती. ‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा असूनही असा कोणताही थेट कायदेशीर आधार उपलब्ध नव्हता. हीच त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने कलम ३ मध्ये सुधारणा करून ‘वंदे मातरम’चा यामध्ये समावेश केला आहे.

या विधेयकात २४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बंकीमचंद्र चॅटर्जी लिखित ‘वंदे मातरम’ या गीताने अतुलनीय योगदान दिले होते. म्हणूनच, ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीत ‘जन गण मन’सारखाच दर्जा आणि सन्मान दिला गेला पाहिजे, अशी भूमिका घटना समितीने मांडली होती. कायद्यातील या सुधारणेमुळे घटना समितीच्या भूमिकेला आज कायदेशीर बळ मिळाले आहे.

गृह मंत्रालयाचे महत्त्वाचे निर्देश आणि नवीन नियमावली
गृह मंत्रालयाने याआधीच ‘वंदे मातरम’च्या गायनासंदर्भात एक विस्तृत नियमावली (प्रोटोकॉल) जारी केली आहे:

लाल किल्ल्यावरून प्रथमच गायन: यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून ‘वंदे मातरम’चे गायन केले जाणार आहे.
६ कडवी आणि वेळ: अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ची सर्व ६ कडवी गायली जातील. यासाठी ३ मिनिटे १० सेकंदांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
प्राधान्यक्रम: कोणत्याही शासकीय कार्यक्रमात राष्ट्रगीत (जन-गण-मन) आणि राष्ट्रीय गीत एकत्र वाजवले किंवा गायले जाणार असल्यास, ‘वंदे मातरम’ प्रथम गायले जाईल.
आदर आणि शिस्त: राष्ट्रीय गीत सुरू असताना उपस्थितांना सावधान स्थितीत उभे राहणे बंधनकारक असेल.
शाळांमध्ये सुरुवात: देशातील सर्व शाळांमध्ये दैनंदिन कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम’च्या समूहगायनाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles