मनपा कर्मचारी धीरज परदेशी मृत्यू प्रकरण; आणखी एकाला अटक

महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज कचरूसिंग राजपूत-परदेशी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यात आणखी एकाचा सहभाग पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. मुख्य संशयित आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून इम्रान मुसा सय्यद (रा. सिव्हील कॉलनी, मुकुंदनगर) याला भिंगार कॅम्प पोलिसांनी गुरूवारी (13 ऑगस्ट) अटक केली. न्यायालयाने त्याला 17 ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

धीरज राजपूत-परदेशी हे मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे पथदिव्यांच्या दुरूस्तीचे काम करीत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच 9 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद (तिघेही रा. आलमगीर, भिंगार) यांना पोलिसांनी हैदराबाद येथून ताब्यात घेतले होते. त्यांना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून ख्वाजामिया उर्फ अकरम याकुब सय्यद (रा. आलमगीर) आणि वसीम रहिम सय्यद (रा. फकीरवाडा, मुकुंदनगर) यांनाही नगरमधून अटक करण्यात आली. याशिवाय महापालिकेचा वायरमन युनूस खान यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांकडे सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

तपासादरम्यान मुख्य संशयित तिघांना इम्रान सय्यद याने मदत केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मुख्य संशयितांना त्याने नेमकी कोणत्या स्वरूपाची मदत केली, हत्येच्या घटनेशी त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, तसेच घटनेनंतर आरोपींना लपण्यासाठी अथवा पळून जाण्यासाठी त्याने कोणती मदत केली, याचा तपास पोलीस कोठडीत केला जाणार आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यामुळे तपासात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles