पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला गती मिळत आहे. जिल्हा बँकेच्या २७७ शाखांमध्ये १३६६ सोसायटीचे थकबाकीदार असलेल्या ६६ हजार १४७ शेतकऱ्यांच्या कर्जापोटी बँकेकडे ६२७.४७ कोटी रुपये शासनाकडून जमा झाले आहेत, अशी माहिती जिल्हा बँकेच्या प्रशासक संगीता डोंगरे यांनी दिली.डोंगरे म्हणाल्या, शासनाकडून प्राप्त पहिल्या यादीमधील १ लाख १६ हजार ५१२ कर्जदार सभासदांपैकी १ लाख ५ हजार २२८ सभासदांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. ११ हजार २८४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण मृत, ॲग्रीस्टक फार्मर आयडी नसणे, परगावी, स्थलांतरित, बायोमॅट्रिक न होणे आदी कारणांमुळे बाकी आहे.
ज्या शेतकरी सभासदांची प्रमाणीकरण प्रक्रिया होऊ शकेल अशा सर्वांची बँक व संस्थेमार्फत पाठपुरावा करून प्रमाणीकरण प्रक्रिया चालू आहे. पात्र सभासदांपैकी मृतांच्या कर्जखात्यांना वारस नोंद करण्याची प्रक्रिया वारसांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पातळीवर पूर्ण करून घेण्याची सूचना देण्यात आल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगितले.
दरम्यान, आधार प्रमाणीकरणात अहिल्यानगर अव्वल आहे. त्यासाठी मेहनत घेतलेले जिल्हयातील सर्व सचिव, त्यांची यंत्रणा आणि बँक कर्मचारी तसेच तालुका सहनिबंधक व लेखापरिक्षक यांचे बँकेचे प्रशासक डोंगरे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी कौतुक केले आहे. याकामी सहकार विभाग, जिल्हा लेखापरिक्षक कार्यालय तसेच जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक, व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


