राज्य शासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या तोंडावर अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्याचा विषय राज्य शासनाच्या विचाराधीन होता. यावर अखेर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले असून वित्त विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.
राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 58 टक्क्यांवरून 60 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची थेट वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 1 जानेवारी ते 31 जुलै 2026 या 7 महिन्यांच्या कालावधीची थकबाकी कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट 2026 च्या वेतनासोबत रोखीने दिली जाणार आहे.ऑगस्ट महिन्याच्या वेतनात 7 महिन्यांची थकबाकी आणि 2 टक्के वाढलेला महागाई भत्ता एकत्र मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. आगामी सणासुदीच्या काळात, विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील सध्या अस्तित्वात असलेल्या विद्यमान तरतुदी, नियम आणि कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढेही लागू राहतील, असे वित्त विभागाने आपल्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय
- Advertisement -


