छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर 21 ऑगस्ट 2026 रोजी एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 19 वर्षीय कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे (48) आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे.छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगर परिसरातील चांदगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी घटनेनंतर आता या प्रकरणाला कौटुंबिक वादाचा नवा अँगल समोर आला आहे. सुरुवातीला हा वाद आयफोन खरेदीवरून किंवा त्याच्या ईएमआयवरून झाल्याची चर्चा होती; मात्र, डीसीपी नवले यांनी स्पष्ट केले की, प्राथमिक तपासात आयफोन हेच मृत्यूचे कारण असल्याचा कोणताही थेट पुरावा किंवा संबंध समोर आलेला नाही, ही केवळ एक चर्चा आहे. आता कुणाल चांदगुडेची आई संगीता चांदगुडे यांचे सोशल मीडिया अकाउंट समोर आले आहे. संगीता चांदगुडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. या व्हिडिओंमध्ये त्यांनी पती मुरलीधर चांदगुडे यांच्यासोबतच्या कौटुंबिक वादाबाबत आणि घरातील परिस्थितीबाबत भाष्य केल्याचे दिसून येते.
संगीता चांदगुडे यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या आणि मुरलीधर चांदगुडे यांच्या संसारात एका नातेवाईक महिलेच्या हस्तक्षेपामुळे वाद निर्माण होत असल्याचा त्यांनी आरोप केला होता. तसेच सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला आणि त्यानंतर घरातील वाद अधिक वाढल्याचेही त्यांनी या व्हिडिओंमध्ये सांगितल्याचे समोर आले आहे. या काळात काही नातेवाईकांकडून आपल्याला आणि पतीला त्रास झाल्याचाही दावा संगीता चांदगुडे यांनी केला होता. मुलाच्या मृत्यूच्या घटनेनंतर मुरलीधर चांदगुडे यांनाही या परिस्थितीचा मानसिक धक्का बसल्याचे त्यांनी सांगितल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. दरम्यान, या सोशल मीडिया व्हिडिओमधील दावे आणि खवड्या डोंगरावरील घटनेचा नेमका संबंध काय, याचा तपास पोलिसांकडून होणे महत्त्वाचे आहे. संगीता चांदगुडे यांनी उल्लेख केलेली तिसरी व्यक्ती कोण आहे, याची चर्चाही सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. त्यामुळे सोशल मीडिया पोस्टमधील आरोपांना अधिकृत निष्कर्ष न मानता, पोलीस तपासातून नेमके सत्य समोर येणार आहे.


