अहिल्यानगर मध्ये आशा सेविकेच्या घरात बोगस डॉक्टरची दुकानदारी; २ लाख ८७ हजार रुपयांची औषधे व वैद्यकीय उपकरणे जप्त

अकोले : तालुक्यातील आदिवासी भागात बाभुळवंडी येथे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करून औषधे, गोळ्या व इंजेक्शन देणाऱ्या बोगस डॉक्टरचा गोरखधंदा आरोग्य विभागाच्या पथकाने उघडकीस आणला. आशा सेविकेच्या घरातच ही कथित बोगस वैद्यकीय दुकानदारी सुरू असल्याचे कारवाईत समोर आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शामकांत शेटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून सुमारे २ लाख ८७ हजार रुपयांची औषधे व वैद्यकीय उपकरणे जप्त केली.या प्रकरणी बिश्वजीत पोटुळ बिश्वास (वय ४३, मूळ रा. धारली उत्तरपारा, पोस्ट मोल्लाबेलिया, जि. नदिया, पश्चिम बंगाल; सध्या रा. पिंपरकणे, ता. अकोले) याच्याविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शामकांत शेटे, सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार, विस्तार अधिकारी यशोदा दत्तात्रय थोरात आणि दोन शासकीय पंच यांच्या पथकाने बाभुळवंडी गावातील सोमनाथ शंकर लेंडे यांच्या घराजवळ चौकशी केली. या परिसरात डॉक्टर कोठे राहतो, अशी विचारणा केली असता संबंधित व्यक्ती याच घरात राहत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पथकाने घराचा दरवाजा ठोठावून आवाज दिल्यानंतर एक व्यक्ती बाहेर आली. त्याने आपले नाव बिश्वजीत पोटुळ बिश्वास असल्याचे सांगितले. पथकाने झडतीचा उद्देश स्पष्ट करून त्याच्या राहत्या ठिकाणाची झडती घेतली असता रुग्णांची तपासणी करण्यासाठी लागणारे साहित्य, इंजेक्शन, गोळ्या, सिरप आणि अन्य वैद्यकीय साहित्य आढळून आले.

या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शामकांत शेटे यांनी राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक २५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(४), ३१६(२) तसेच वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ मधील कलम ३३(२), ३४ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशा सेविकेच्या घरातच बोगस डॉक्टरकडून कथितपणे उपचार सुरू असल्याचे कारवाईत समोर आल्याने आता संबंधित आशा सेविकेविरुद्ध आरोग्य विभागाकडून काय कारवाई केली जाते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सुनील रत्नपारखी आणि सचिन शिंदे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles