पारनेर शहराचा चेहरा-मोहरा बदलवणार :- सुजित झावरे पाटील यांची घोषणा
डीपीआर मंजूर झाल्याने विकासाचा सर्वात मोठा अडथळा दूर; दोन कोटींच्या रस्त्यांच्या कामांसह शाश्वत पाणी योजनेवर भर
पारनेर : – पारनेर शहराचा अनेक वर्षांपासून रखडलेला विकास आता वेगाने मार्गी लावण्यात येणार असून, आगामी काळात पारनेर शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केला. शहरातील सुमारे एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना त्यांनी ही ग्वाही दिली. यापूर्वी सुमारे दोन कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले असून, भविष्यात आणखी दोन कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पारनेर शहराच्या विकासाच्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला शहर विकास आराखडा अर्थात डीपीआर मंजूर करून आणण्यात यश आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा डीपीआर मंजूर करून आणल्याने पारनेर शहराच्या विकासामध्ये येणारा सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील विकासकामांना गती मिळणार असून, नियोजनबद्ध पद्धतीने पारनेरचा विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
शहरातील सर्व रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण
पारनेर शहरात यापूर्वी सुमारे दोन कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. आता आणखी एक कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले असून, भविष्यात दोन कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे.
शहराच्या हद्दीतील सर्व प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले. शहरातील नागरिकांना चांगले रस्ते, मूलभूत सुविधा आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हा विकासाचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
🛑सौरऊर्जेवर आधारित शाश्वत पाणी योजना
पारनेर शहराच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रश्न असलेल्या पाणीपुरवठ्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी शाश्वत पाणी योजना आणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पारनेर शहराला नियमित व शाश्वत पाणी मिळेल, अशी योजना भविष्यात शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे ही पाणी योजना सौरऊर्जेवर आधारित करण्याचा प्रयत्न असून, त्यामुळे पाणी योजनेसाठी लागणाऱ्या विजेचा खर्च कमी होईल. परिणामी वीज बिलाचा अतिरिक्त आर्थिक भार नागरिकांवर पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाणी योजनेबरोबरच शहरातील इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही आगामी काळात सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाराशर ऋषींच्या स्मृती जतन करणार
पारनेर ही पाराशर ऋषींची पवित्र भूमी असून, या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचे जतन करणे हे आपले ध्येय असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले. पाराशर ऋषींच्या स्मृती जतन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच पारनेरच्या धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
पारनेरमध्ये बारा ज्योतिर्लिंगांचे वास्तव्य असल्याने या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पारनेरचा ऐतिहासिक वारसा जतन करून शहराला राज्याच्या आणि देशाच्या पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी सातत्याने काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
स्व.वसंतराव झावरे पाटील यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणार
यावेळी सुजित झावरे पाटील यांनी माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.
वसंतरावदादांनी पारनेर तालुक्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे केली. पारनेर शहरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि क्रीडा संकुल यांसारख्या महत्त्वाच्या सुविधा उभ्या करून त्यांनी शहराबरोबरच संपूर्ण तालुक्याचा नावलौकिक वाढविला. त्यांच्या विकासाच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पारनेर शहराचा नावलौकिक वाढविण्यासाठी आणि पर्यायाने संपूर्ण तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
डीपीआरमुळे जमिनींचे भाव वाढणार; बाजारपेठेलाही मिळणार चालना
पारनेर शहराचा डीपीआर मंजूर झाल्याने शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या विकास आराखड्यामुळे शहराचा विस्तार नियोजनबद्ध पद्धतीने होणार असून, आगामी काळात शहरातील जमिनींच्या किमती वाढण्यासही मदत होईल, असा विश्वास सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केला.
डीपीआरचा सर्वाधिक फायदा स्थानिक शेतकऱ्यांनाही भविष्यात होणार असून, शहराच्या विकासासोबतच येथील बाजारपेठेचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शहरात नवीन व्यावसायिक संधी निर्माण होतील आणि नागरिकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
डीपीआरमुळे विकासकामांमध्ये येणारे अनेक प्रशासकीय व नियोजनात्मक अडथळे दूर झाले असून, आता शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य महामार्ग २२ मीटरचा करण्यासाठी आंदोलनाचीही तयारी
पारनेर शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचा मुद्दाही सुजित झावरे पाटील यांनी यावेळी स्पष्टपणे मांडला. शासकीय नियमाप्रमाणे हा रस्ता २२ मीटर रुंदीचा झाला पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील ग्रामस्थ आणि तरुण मंडळी या रस्त्याच्या प्रश्नासाठी जे प्रयत्न करीत आहेत, त्यांना आपला जाहीर पाठिंबा असून, संबंधित अधिकारी, मंत्री आणि शासनाकडे आपण या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ता २२ मीटर करण्यासाठी आवश्यकता भासल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचीही आपली तयारी आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. हा रस्ता रुंद झाल्यास पारनेर शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल. शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढेल, वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि त्याचा थेट फायदा स्थानिक व्यापार व बाजारपेठेला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘२२ मीटर रस्त्याला अडथळा आणू नका’
पारनेर शहर हे संपूर्ण तालुक्याचे प्रमुख ठिकाण असल्याने शहराचा विकास झाला तर त्याचा थेट फायदा संपूर्ण पारनेर तालुक्याला होणार आहे. त्यामुळे २२ मीटर रस्ता होऊ नये म्हणून कोणीही अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन सुजित झावरे पाटील यांनी ग्रामस्थ आणि नागरिकांना केले.
रस्ता रुंद झाल्यामुळे भविष्यात शहराचा विस्तार, व्यापार, बाजारपेठ आणि नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. त्यामुळे या विकासकामाकडे केवळ आजच्या दृष्टीने न पाहता भविष्यातील पारनेरचा विचार करून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विकासकामांचा वेग कायम ठेवणार
डीपीआर मंजूर झाल्याने पारनेर शहराच्या विकासाला आता निश्चित दिशा मिळाली आहे. रस्ते, पाणी, पायाभूत सुविधा, धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचा विकास, बाजारपेठेचा विस्तार तसेच शहराचे सुशोभीकरण या सर्व बाबींवर आगामी काळात टप्प्याटप्प्याने काम करण्यात येणार आहे.
“पारनेर शहराचा रखडलेला विकास आता थांबणार नाही. उपलब्ध निधीबरोबरच शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहोत. भविष्यात पारनेर शहराचा चेहरा-मोहरा बदललेला दिसेल,” अशी ग्वाही सुजित झावरे पाटील यांनी दिली.


