महिला आरोपीने स्वतःच केला सर्पदंश झाल्याचा बनाव : नेवासा पोलीस कोठडीतील धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर – नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी टाळण्यासाठी नेवासा पोलीस कोठडीतील एका महिला आरोपीने स्वतःच्या पायाला पिन टोचून सर्पदंश झाल्याचा खोटा बनाव केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिल्या दत्तात्रेय मैराळ असे या महिला आरोपीचे नाव आहे.
बालविवाह, पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत सदर महिला आरोपीला अटक करण्यात आलेली असून ती नेवासा पोलीस कोठडीत होती. सोमवारी (दि. २४) सकाळी तिने अचानक आरडाओरड करत आपल्याला साप चावल्याचा दावा केला. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेत तिला वैद्यकीय उपचारासाठी नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर पुढील तपासणीसाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिच्यावर कोणताही सर्पदंश झाल्याचे आढळून आले नाही.

यानंतर पोलिसांना या घटनेबाबत संशय निर्माण झाला. पोलिसांनी पोलिस कोठडीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संपूर्ण प्रकाराचा उलगडा झाला. फुटेजमध्ये संबंधित महिला आरोपी स्वतःच्या पायाला पिन टोचत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी होऊ नये, या उद्देशाने तिने हा बनाव केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वैद्यकीय तपासणी आणि सीसीटीव्ही फुटेजमधून सर्पदंशाचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला पुन्हा पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles